घटस्थापना

3086

>>मीना आंबेरकर<<

आजपासून देवीचा उत्सव सुरू होत आहे. घरोघरी घटस्थापना होईल. सज्जनांच्या रक्षणासाठी देवी आज प्रगट झाली आहे.

अश्विन शु. प्रतिपदा हा घटस्थापनेचा दिवस. नवरात्रीचे दिवस म्हणजेच शक्तीची उपासना करण्याचे दिवस. अर्थात ही शक्ती उपासना आपण कोणत्या रूपात स्वीकारतो ते आपल्यावर अवलंबून आहे. मग ती शक्ती मानसिक किंवा आंतरिक असू शकते, सद्विचारांची असू शकते. शारीरिक शक्ती वाढवण्यासाठीही ही उपासना केली जाते. या उपासनेमागे काहीतरी उत्तम नैतिक मूल्यावर आधारित असणे आवश्यक असते.

सर्वसामान्यपणे आपण  आदिशक्तीची उपासना करण्याचा हा कालावधी आहे असे मानतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. घरोघरी कुळाचाराप्रमाणे आणि देवीच्या देवळांमध्ये भक्तिपूर्वक घटस्थापना केली जाते. काही ठिकाणी प्रत्यक्ष घटाची स्थापना असते तर काही ठिकाणी अष्टभूजा देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. प्रथम एक वेदी उभारून त्यावर माती पसरून विविध धान्ये पेरतात. शास्त्र्ाशुद्ध पद्धतीने त्यावर घट किंवा देवीची मूर्ती यांची स्थापना केली जाते. या नऊ दिवसांत केवळ फलाहार, मौनक्रत, सप्तशतीचा पाठ असे अनेक आचार नियम पाळले जातात.

स्त्री हा समाजातील उपेक्षित घटक नाही हे तिने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे, परंतु काही समाजकंटकांना हे मान्य होत नाही. स्त्री आपल्यापेक्षा वरचढ कशी होऊ शकते ही त्यांची समस्या आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तिचा अनादर केला जातो, परंतु ही स्त्रीशक्ती जेव्हा अन्यायाने पेटून उठते तेव्हा ती महिषासुरासारख्या बलाढय़ राक्षसाचा संहार करते, त्याच्यावर विजय प्राप्त करते असे या सणाचे महात्म्य आहे. स्वतःच्या स्त्रीत्वाची जपणूक करण्यासाठी ती  उग्ररूप धारण करते व तिच्यावर उगारलेल्या शस्त्राला ती नामोहरम करून टाकते असा या सणाचा उदात्त हेतू आहे. त्याच गांभीर्याने हा सण साजरा केला जावा.

केवळ नटूनथटून, मौजमस्ती, दांडिया खेळणे म्हणजे नवरात्र असे या सणाचे स्वरूप न राहता त्यामागचे पावित्र्य व गांभीर्य लक्षात घेऊन त्यादृष्टीने समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे किंवा नुसती कुलाचाराप्रमाणे काटेकोरपणे घटस्थापना करून क्रतपालनाचे समाधान मिळविण्यापेक्षा या क्रताचा उद्देश लक्षात घेऊन त्यामागच्या नीतिमूल्यांना पायदळी न तुडवता हा सण साजरा केल्याने आपल्याला मानसिक समाधान मिळेल.

महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी यांची पूजा

या नवरात्रोत्सवात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांची पूजा आणि सप्तशतीचा पाठ याला विशेष महत्त्व आहे. स्त्रीशक्तीला दिलेला मान असे या सणाचे स्वरूप आहे. स्त्रीशक्तीबद्दल आदर व्यक्त करणे हे महत्त्वाचे कार्य या क्रतामागे आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीत स्त्रीयांचा सन्मान हा महत्त्वाचा भाग आहे. स्त्रीला अबला समजून तिच्यावर अन्याय करणे, जबरदस्ती करणे, तिची मानहानी करणे, तिची विटंबना करणे ही प्रवृत्ती फारच बोकाळली आहे. तिला आळा घालण्याचे काम या उत्सवामुळे झाले तर हे क्रत फलद्रूप होऊ शकेल.

मुहूर्त

नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेचा मूहूर्त २१ सप्टेंबर रोजी गुरुवारी अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेला श्री आई अंबाबाईची, जगदंबेची श्री घटस्थापना सकाळी ०६:३० ते ०८ः०० वाजता (शुभ) आहे, सकाळी १०ः१८ ते १२ः ३१ पर्यंत स्थिर वृश्चिक लग्न, दुपारी १२ः३० ते ०१ः३० (लाभ) आहे.

पूजा विधी

घटस्थापनेचा विधी शक्यतो मुहूर्तावरच केला जातो. या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या श्री कुलदेवीची घटस्थापना आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार व परंपरेनुसार करावी. एका तांब्याच्या कलशावर ताम्हण ठेवून त्यात मंडलाकार मुख्य देवता महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती यांची व त्याच्या अनेक परिवार देवतांची स्थापना करतात. दुसऱया एक तांब्याचा कलश शुद्ध पाण्याने भरून त्यात सुगंधी द्रव्ये, सवा रुपया व सुपारी ठेवतात. कलशाच्या मुखावर आंब्याची पाच पाने ठेवून त्यावर मध्यभागी नारळ ठेवतात. या कलशाच्या पायथ्याशी एका परडीत लाल माती टाकून त्यामध्ये नऊ प्रकारची धान्ये पेरतात. ते छोटेसे शेत फुलून आले की, घरामध्ये धनधान्याची समृद्धी होते अशी कल्पना आहे. या रुजवणाच्या एका बाजूला घंटा, दुसऱया बाजूला शंख इ. मधोमध निरांजन प्रज्वलित करून ठेवतात. देवीसमोर नंदादीप नऊ दिवस अखंड पेटत ठेवतात. कलशाला पुष्पहार घालून कलशावर झेंडूच्या फुलांची माळ सोडतात. घराच्या मुख्य दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधण्याची प्रथाही आहे. नवीन रेशमी वस्त्र नेसून पूजेच्या वेळी पाटावर बसतात. समई प्रज्वलित करून स्वतःला कुंकू लावून पूजा सुरू करतात.

महिषघ्नि महामाये

चामुण्डे मुण्डमालिनी।

द्रव्य आरोग्य विजयं

देहि देवि नमोस्तुते।।

या श्लोकाने मी माझ्या विचारांची सांगता करते.

आपली प्रतिक्रिया द्या