अंबा बैसली सिंहासनी हो।

दा.कृ.सोमण

भवानी आईच्या नऊ रात्रींचे वर्णन करणारी आरती फार अर्थपूर्ण आहे .या वर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत एकाही तिथीची क्षयवृद्धी न झाल्यामुळे नवरात्र नऊ दिवसांचीच आली आहे. विजयादशमी-दसरा दहाव्या दिवशी शनिवार, ३० सप्टेंबर रोजी आला आहे. नवरात्रातील दुर्गा पूजा ही आदिशक्ती-निर्मितीशक्तीची पूजा असते. हे दिवस शरद ऋतूचे असतात. शेतात तयार झालेले धान्य घरात येते. हे दिवस समृद्धीचे असतात. म्हणून कुणालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण ‘जीवेत शरदः शतम्’ असे म्हणतो. निर्मितीशक्ती आणि ब्रह्मसंख्या नऊ अंक यांचे अतूट नाते आहे. कारण बी जमिनीत पेरल्यापासून नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने, नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. म्हणूनच आदिशक्ती-निर्मितिशक्तीचा हा उत्सव नऊ दिवसांचा असतो.

अश्विन शुद्धपक्षी अंबा!

नवरात्रात दुर्गादेवीची पूजा झाल्यानंतर नवरात्रीची आरती म्हटली जाते. प्रज्वलित निरांजन, पणती किंवा दिवा तबकात ठेवून त्याने देवताना ओवाळण्याच्या विधीला आरती म्हणतात. देवतेच्या स्तुतिपर गीतालाही आरती म्हणतात. आरती हा शब्द ‘आरात्रिक’ या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. आरात्रिक म्हणजे ओवाळणे! आरतीमध्ये देवतेकडे मंगलाची आणि ऐश्वर्याची इच्छा प्रकट केलेली असते. नवरात्रीची सुंदर आरती विप्र रामदास कवीने केलेली आहे. ही रचना भावपूर्ण आहे. या आरतीमध्ये देवीचे महात्म्य वर्णन केलेले आहे.

नवरात्रीची ‘अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हे’ ही विशेष लोकप्रिय आरती आहे. या आरतीमध्ये काय सांगितले आहे ते आपण समजून घेऊया. नवरात्रीमधील नऊ दिवस वर्णन केले आहेत. अश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी अंबामाता सिंहासनावर बसली असून या दिवशी मंत्र, जप, जाप्य करून घटस्थापना केली जाते. ब्रह्मा, विष्णू, रुद्र हे तिघेही अंबामातेची मनोभावे पूजा करतात. अशा या अंबामातेचा उदोउदो करावा, जयजयकार करावा असे पहिल्या चरणात कवीने सांगितले आहे. दुसऱया चरणात द्वितीयेला चौसष्ट योगिनींचे वर्णन करून त्यात परशुरामाची माता रेणुका भांगामध्ये शेंदूर भरल्याने अतिशय सुंदर दिसतेय असे म्हटले असून चामुंडा मातेचा उदोउदो केला आहे. तिसऱया चरणात तृतीयेला अंबामातेच्या साजशृंगाराचे सुंदर वर्णन कवीने केले आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असून तिने गळ्यात मोत्याची माळ घातली आहे. अष्टभुजा देवीचे केलेले वर्णन ऐकून भक्तांच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष देवी दिसू लागते. चौथ्या दिवशी विश्वास व्यापून टाकणारी अंबामाता प्रसन्न अंतःकरणाने भक्तांकडे पाहत असल्याचे म्हटले आहे. तिला कवीने भक्तांची माऊली म्हटले आहे. अश्विन शुक्ल पंचमीला उपांगललिता व्रत केले जाते. याचा उल्लेख करून रात्री हरिकथा ऐकल्याने मन प्रसन्न होते असे म्हटले आहे. सहाव्या दिवशी देवी भक्तांच्या गोंधळाचे वर्णन केलेले आहे. गोंधळ व जोगवा हे देवीला प्रिय आहेत. ते केल्याने देवी भक्तांवर प्रसन्न होते असे म्हटले आहे. सातव्या दिवशी सप्तशृंगगडाचे वर्णन केले आहे. भक्त संकटात पडला तर देवी ते संकट वरचेवर झेलते आणि भक्तांना संकटमुक्त करते असे म्हटले आहे. आठव्या चरणात देवी सह्याद्री पर्वतावर उभी असून शरण आलेल्या भक्ताला कसे सुखी करते ते सुंदर रीतीने सांगितले आहे. नवव्या दिवशी नऊ दिवसांचे पारणे फेडून सप्तशती, जप, होमहवन करून षड्रस अन्नाचा नैवेद्य अर्पण केला जातो त्याचे वर्णन केलेले आहे.

दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱयाच्या दिवशी अंबामाता सीमोल्लंघन करते. सिद्धारूढ अशी अंबामाता शस्त्राने शुंभ-निशुंभ राक्षसांना ठार मारते. अखेर विप्र रामदास यांना देवीने तिच्या चरणी आश्रय दिला असल्याचे म्हटले आहे. विप्र रामदास या कवीने केलेली ही आरती नवरात्रात रोज म्हटली जाते. या आरतीची चालही चांगली आहे. ही आरती मधुर आवाजात प्रसन्नतेने म्हटल्याने वातावरण मंगलमय होऊन जाते.

या देवी सर्वभूतेषु । बुद्धीरूपेण संस्थिता।।

नमस्तस्यै नमस्तस्यै । नमस्तस्यै नमो नमः।।

उपवासाचे महत्त्व!

नवरात्रात उपासक नऊ दिवस उपवास करतात. ‘पापकर्मापासून निवृत्त झालेल्या माणसाचा सद्गुणांसह वास म्हणजे उपवास’ असे ग्रंथात सांगण्यात आले आहे. त्यात सर्व भोग वर्ज्य करावयाचे असतात. सर्वसाधारणपणे उपवासाचा अर्थ हलका व कमी आहार घेणे असा केला जातो. उपवास केल्याने आपण परमेश्वराच्या अधिक जवळ जात असतो असेही सांगण्यात आलेले आहे. वेदांमध्ये यज्ञ, दान, तप आणि उपवास हे ईश्वरप्राप्तीचे मार्ग असल्याचे सांगण्यात आले आहे. उपवास केल्याने शरीर हलके राहते, शरीराला मांद्य येत नाही. त्यामुळे आपले चित्ताची एकाग्रता येणे सुलभ होते. उपवास हा आत्मशुद्धीसाठी करावयाचा असतो. चंचल मनाला स्थिर करण्यासाठी करावयाचा असतो. केवळ फळे खाऊन उपवास केला जातो. काही उपासक केवळ पाणी पिऊन उपवास करतात, तर काही भक्त एक दिवसाचा उपवास निर्जळी म्हणजे अन्न-पाणी काहीही न घेता उपवास करतात. असे उपवास मात्र शरीराच्या आरोग्याला घातक ठरू शकतात. उपवासामुळे मन निग्रही होण्यास मदत होते. उपवासांमुळे सद्विचारांची संगत लाभण्यास मदत होते. झेपतील अशा उपवासांमुळे शरीराचे, मनाचे आणि बुद्धीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणून नवरात्रात उपवासाचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येकाने त्याला झेपतील असेच उपवास करावेत. उपवासासाठी कुणावर कुठलीही जबरदस्ती केली जाऊ नये. उपवास हे एक साधन आहे, साध्य नाही हे लक्षात घ्यावे.

आपली प्रतिक्रिया द्या