भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवाला प्रारंभ

सामना प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंग गड, नाशिकच्या कालिका माता मंदिरासह जिल्ह्यातील सर्व देवी मंदिरांमध्ये आज भक्तीमय वातावरणात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. पहिल्याच माळेला सर्व मंदिरे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती.

सप्तशृंग गडावर देवी भगवतीचे सुवर्णालंकार व महावस्त्रांची ट्रस्ट कार्यालयापासून मंदिरापर्यंत सकाळी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गाभारा व मंदिर फुलांनी सजविले होते. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी न्यासाच्या अध्यक्षा, अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर, विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी यांसह ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, प्रकाश पगार, भिकन वाबळे उपस्थित होते.

विधीवत पद्धतीने घटस्थापना होवून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. दिवसभरात ५० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शनाला हजेरी लावली. दुपारपर्यंत अठरा हजारांहून अधिक भाविकांनी प्रसादालयात महाप्रसादाचा लाभ घेतला.

नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता मंदिर येथे महापूजा, घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भक्तीमय, चैतन्यदायी वातावरणाची चांदवड येथील रेणूका माता मंदिर, भगूर येथील रेणूका देवी मंदिर, वणी येथील जगदंबा माता मंदिर, कोटमगावचे जगदंबा माता मंदिरात प्रचिती आली, येथे पहिल्याच माळेला हजारो भाविकांनी हजेरी लावली.