
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदुस्थानी नौदलाच्या “भारत का गर्व” या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी THINK NATIONAL QUIZ COMPETITION (थिंक राष्ट्रीय प्रश्नोत्तरी स्पर्धा) चे आयोजन करण्यात आले होते. यातून विद्यार्थ्यांना भारतीय नौदलाची ओळख व्हावी आणि त्यांनाही थेट देशसेवेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी आयएनएस विक्रमादित्य (INS Vikramaditya) युद्ध नौकेवर आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये कल्याण येथील ‘भाल गुरुकुल इंग्लिश मीडियम’ शाळेतील कु. स्नेहा सतीश झा आणि कु. अनन्या निळकंठ मुंडे या दोन विद्यार्थिनींनी अंतिम फेरीत दुसरा क्रमांक पटकावत शाळेसह महाराष्ट्राची मान उंचावली आहे. त्याचबरोबर कु. स्नेहा सतीश झा हिला ह्या स्पर्धेत ‘best quizzer’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
यास्पर्धेसाठी देशभरातील 7500 शाळांपैकी पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत यश मिळवत देशभरातील 16 शाळा उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्या. यामध्ये कल्याण येथील भाल गुरुकुल इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थिनींची निवड झाली होती. उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी दोन्ही विद्यार्थिनींना सहा दिवसांसाठी आयएनएस विक्रमादित्य युद्ध नौकेवर राहण्याची संधी मिळाली. यास्पर्धेत त्यांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारत दुसरा क्रमांक पटकावला. यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली असून दोघींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आमच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे बुद्धीला आव्हान देणारी, कसोटी बघणारी असली तरी त्यातून आम्हाला भारतीय नौसेनेच्या कार्यपद्धतींना आणि आयएनएस विक्रमादित्य (INS Vikramaditya) युद्ध नौकेला जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली, राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळाल्याचं, स्नेहा झा आणि अनन्या मुंडे या विजेत्या विद्यार्थिनींनी सांगितलं.
यासंदर्भात बोलताना शाळेचे व्यवस्थापक विश्वस्त निळकंठ मुंडे यांनी ‘संधी घडत नाहीत, त्या तुम्हीच निर्माण करायच्या असतात आणि इथे भाल गुरुकुल शाळेच्या विद्यार्थिनींनी खरंच ते निर्माण केलं. स्पर्धेत दुसरं स्थान मिळवून त्यांनी इतिहास रचला आहे. शाळेसोबत त्यांनी महाराष्ट्राची शान वाढवली आहे. या विद्यार्थिनींचा शाळेला अभिमान आहे’, अशा भावना व्यक्त केल्या.
विजेत्या दोन्ही विद्यार्थिनींना नौदलाकडून प्रशस्तीपत्रक, प्रत्येकी एक लॅपटॉप आणि प्रत्येकी 50 हजार रुपयांचा चेक देऊन गौरवण्यात आले असे शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा सिंग यांनी सांगितले.
The 1st and 2nd runner up teams – Bhal Gurukul School, Kalyan and DPS, Ranchi put up a tough fight. #THINQ22. #NWWA and @indiannnavy congratulates them. Look forward to seeing teams combat for the title same time next year.#BiggestQuizCompetition pic.twitter.com/YqKlECwSbr
— NAVY WELFARE AND WELLNESS ASSOCIATION (@NWWA_INDIANNAVY) November 24, 2022