
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे गंभीर आजारी असल्याचे मान्य करीत त्यांच्या जामीन अर्जावर प्राधान्याने सुनावणी करण्यास उच्च न्यायालय तयार झाले आहे. मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी शुक्रवारी सलग दुसऱया दिवशी युक्तिवाद सुरू ठेवत सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ दिला आणि मलिक हे गंभीर आजारी असल्याचे पटवून दिले. त्यांचा युक्तिवाद स्वीकारत न्यायालयाने मलिक यांच्या जामिनाची सुनावणी मंगळवारपासून घेण्याचे निश्चित केले.
कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात मागील वर्षभर न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सत्र न्यायालयाने जामीन नाकारला होता. त्या निर्णयानंतर मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जाची प्राथमिक सुनावणी करताना न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी मलिक हे आजारी असल्याचे पटवून देण्याची सूचना मलिक यांच्या वकिलांना केली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी जोरदार युक्तिवाद करीत मलिक हे आजारी व्यक्ती असून ते जामिनासाठी पात्र असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्याची दखल घेत न्यायमूर्ती कर्णिक यांनी नवाब मलिक हे गंभीर आजारी असल्याचे दिसून येते, असे मत नोंदवले आणि जामीन अर्जावर मेरिटचा विचार करीत प्राधान्याने सुनावणी घेण्यास तयारी दर्शविली. यावेळी ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे न्यायालयात उपस्थित होते. मलिक यांना गेल्या वर्षी 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. ते सध्या किडनी विकाराने त्रस्त असून कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बालगुन्हेगार, महिला आणि आजारी व्यक्तींना आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अजामीनपात्र गुह्यांसाठीही न्यायालय जामीन मंजूर करू शकते. या अनुषंगाने पीएमएलए कायद्याच्या कलम 45 मध्ये असलेले अपवाद ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याचवेळी विविध प्रकरणांत याच तरतुदीच्या आधारे मिळालेल्या जामिनाकडे लक्ष वेधले. त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.