Sameer Khan – नवाब मलिक यांच्या जावयाचा मृत्यू; काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेला भीषण अपघात

माजी आमदार आणि नुकतेच काँग्रेसमधून अजित पवार गटामध्ये आलेल्या बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून निर्घृणपणे करण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचाही मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला भागामध्ये त्यांचा भीषण अपघात झाला होता.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा शनिवारी रात्री दहाच्या सुमारास मृत्यू झाला. कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

समीर खान आणि त्यांची पत्नी निलोफर खान कुर्ला येथील क्रिटी केअर रुग्णालयात नियमित तपासणीसाठी गेले होते. यावेळी त्यांची कार चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी (वय – 38) चालवत होता. तपासणी करून बाहेर आल्यावर समीर आणि निलोफर हे दांपत्य गाडीत बसत असताना चालकाकडून अचानक अॅक्सीलेटरवर पाय ठेवला गेला आणि गाडी एचडीआयएल वसाहतीच्या संरक्षण भिंतीजवळ जाऊन आदळली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

गाडीत बसण्याच्या तयारीत असणारे समीर हे देखील गाडी सोबत फरफटत गेले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.