कुलसूम शरीफ यांचे निधन, अंत्यसंस्कारासाठी पती नवाझ शरीफ यांना पॅरोल मंजूर

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसूम शरीफ (68) यांचे लंडन येथील हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये घशाच्या कॅन्सरने निधन झाले. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून रावळपिंडीच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले नवाझ शरीफ, मुलगी मरयम आणि जावई मुहम्मद सफदर यांना अंत्यसंस्कारास उपस्थित राहता यावे यासाठी त्यांना सरकारने पॅरोल मंजूर केला आहे.

कुलसूम यांचे पार्थिव पाकिस्तानात आणण्याचा निर्णय शरीफ कुटुंबीयांनी घेतला आहे. लाहोरजवळील वारयविंद येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. राष्ट्राध्यक्ष डॉ. अरिफ अल्वी, पंतप्रधान इम्रान खान, लष्करप्रमुख उमर जावेद बाजवा आदींनी कुलसूम यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कुलसूम यांच्यावर हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये 2014 पासून उपचार सुरू होते. फुप्फुसाचा त्यांचा आजार बळावल्याने त्यांना जूनपासूनच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.