
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने विभक्त पत्नीच्या ताब्यात असलेल्या मुलांच्या भेटीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माझी दोन मुले कुठे आहेत, त्यांचा ठावठिकाणा सांगण्यासाठी विभक्त पत्नीला निर्देश द्या, अशी विनंती त्याने याचिकेत केली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी दोन्ही मुले हिंदुस्थानात असल्याचे पत्नीने स्पष्ट केले. त्याची दखल घेताना न्यायालयाने मुलांच्या पुढील शिक्षणाबाबत सामोपचाराने तोडगा काढण्याचे निर्देश नवाजुद्दीन व त्याच्या विभक्त पत्नीला दिले.
नवाजुद्दीनने अॅड. प्रदीप थोरात यांच्यामार्फत उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. बारा वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा सध्या कुठे आहेत, याबाबत विभक्त पत्नीने खुलासा करावा, अशी मागणी नवाजुद्दीनने केली आहे. विभक्त पत्नी आणि दोन मुले सध्या सौदी अरेबियाची रहिवासी आहेत. मात्र अलीकडेच मुलांच्या शाळेतून ई-मेल प्राप्त झाला असून त्यात दोन्ही मुले त्यांच्या शाळेमध्ये हजेरी लावत नसल्याचे मेलमध्ये म्हटले आहे. किंबहुना, नोव्हेंबर 2022 मध्ये पत्नी हिंदुस्थानात आली त्यावेळी तिच्यासोबत मुले नव्हती. त्रयस्थ व्यक्तीने माझ्या मुलांचा ताबा घेतला आहे, असा दावा नवाजुद्दीनतर्फे न्यायालयात केला. त्यावर विभक्त पत्नीने दोन्ही मुले हिंदुस्थानात त्यांच्या जन्मदात्या मातेच्या ताब्यात असल्याचे अॅड. रिजवान सिद्दिकी यांच्यामार्फत सांगितले. तसेच ती मुले पुढील शिक्षण हिंदुस्थानात घेण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. त्यावर मुलांच्या पुढील शिक्षणाबाबत काय ठरवलेय, ते कळवण्याचे निर्देश विभक्त पत्नीला दिले.