नवाझुद्दीन सिद्दीकीच्या भावावर त्यांच्या भाचीचा लैंगिक अत्याचाराचा आरोप

1393

प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप करत घटस्फोटाची याचिका दाखल केली असतानाच आता त्याच्या भावावर देखील त्यांच्या भाचीने गंभीर आरोप केले आहेत. नवाझच्या भाचीने त्याच्या भावावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीतील जामिया पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर तरुणीने ती लहान असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले आहे. ‘मी दोन वर्षांची असताना माझ्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर माझ्या बाबांनी दुसरं लग्न केलं. त्यानंतर माझे काका माझा लैंगिक छळ करायला लागले. सुरुवातीला मला ते काय करायचे ते कळायचं नाही. मात्र नंतर मी मोठी झाल्यावर मला त्यांचा तो स्पर्श चुकीचा असल्याचे समजले. ते कधी कधी खूप हिंसकही व्हायचे’, असा आरोप पीडितेने केला आहे.

काही दिवसांपूर्वी नवाझुद्दीन याची पत्नी आलिया हिने त्याला इमेल आणि व्हॉट्सअपच्या साहाय्याने घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. 7 मे रोजी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिसीद्वारे आलियाने घटस्फोट आणि त्यानंतर पोटगीची मागणी केली आहे. घटस्फोटाच्या कारणांचा खुलासा झालेला नसला, तरी तिने सिद्दिकी कुटुंबावर गंभीर आरोप केल्याची माहिती तिचे वकील अभय सहाय यांनी माध्यमांना दिली आहे.

सध्या नवाजुद्दीन त्याच्या गावी म्हणजे मुजफ्फरनगर येथे आहे. लॉकडाऊनमुळे तो मुंबईत अडकून पडला होता. मात्र, गावी त्याच्या लहान बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आईची तब्येत बिघडली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारकडून परवानगी घेऊन आणि सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पाळून त्याने आपलं घर गाठलं होतं. त्यानंतर त्याने स्वतःला एका खोलीत क्वारंटाईनही करून घेतलं. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या