नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आयुष्यात कोरोनामुळे चमत्कार झाला

कोरोनामुळे अनेकांची आयुष्ये उध्वस्त झाली. घरातील कर्ता पुरुष किंवा कर्ती महिला गेल्याने त्यांची कुटुंबे अडचणीत सापडल्याच्या आपण अनेक बातम्या वाचल्या आहेत. मात्र याच जीवघेण्या कोरोनामुळे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आयुष्यात चमत्कार घडला आहे. नव्याने घडलेल्या काही घडामोडींमुळे त्याच्या आयुष्यातील स्थैर्य आणि शांतता पुन्हा नांदण्यास मदत होणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीची बायको आलिया हिने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. व्हॉटसअप आणि ईमेलद्वारे पाठवलेल्या या नोटीसमध्ये तिने नवाझुद्दीनपासून आपल्याला फारकत घ्यायची असल्याचे म्हटले होते. तिने नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शम्स याच्यावरही आरोप केले होते. शम्सने आपल्याला मारहाण केल्याचं तिचं म्हणणं होतं. नवाजुद्दीन आणि आलिया यांचा संसार 10 वर्षांचा असून या दोघांमध्ये काही वर्षांपासून खटके उडायला लागले होते.

nawazuddin-alia

आलियाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. या काळात नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या मुलांची देखभाल केलीच शिवाय आपलीही मनापासून काळजी घेतली असं आलियाने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. मी नवाजुद्दीनवर जे काही आरोप केले होते, ते विसरून जात त्याने माझी सेवा केल्याचे आलियाचे म्हणणे आहे. कोरोनाचा हा कठीण काळ आपल्यासाठी डोळे उघडवणारा ठरल्याचं तिने म्हटलं आहे. या महामारीमुळे आपल्या मुलांचे उत्तम आरोग्य आणि त्यांना मिळणारा आनंद या पलिकडे काहीच नसल्याचे मला जाणवले असे आलियाने म्हटले आहे. त्यांच्या आनंदासाठी नवाजुद्दीनसोबतच्या मतभेदांना मूठमाती देण्याचं आलियाने ठरवलं आहे.

nawazuddin

आलियाने नवाजुद्दीनपासून घटस्फोट घेण्यासाठीचा दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. असं असलं तरी दोघांना सामोपचारासाठी थोडा काळ वाट पाहावी लागणार आहे. आलिया घटस्फोटाची नोटीस दिल्यापासून नवाजुद्दीनसोबत राहात नाहीये. नवाजुद्दीन आणि आलिया यांना यानी आणि शोरा नावाची मुले आहेत. आलियाने घेतलेल्या निर्णयाबाबत बोलताना नवाजुद्दीन म्हणाला की आलिया ही आजही माझ्या मुलांची आई आहे. त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. आमच्या भांडणामुळे मुलांना त्रास व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या