नक्षलवादी आणि अर्ध सैनिक दलांची तयारी

110

ब्रिगेडियर हेमंत महाजन   

[email protected]

माओवाद्यांविरुद्ध लढाईसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, नेतृत्व, मनोधैर्य आदींची कमतरता अर्ध सैनिकी दले व पोलिसांत आहे. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढविण्याला प्राधान्य द्यायला हवे. धैर्य, साहस, लढाऊ वृत्ती यांबाबत ते कमी आहेत. त्यांच्यातील या वृत्तीला चालना देण्याची गरज आहे. त्याकरिता लष्कराची मदत घ्यायला हवी. दहशतवादविरोधी कारवाईसाठी जम्मू आणि कश्मीर तसेच आसाममध्ये लष्कर काम करते. तेथील अनुभव अर्ध सैनिकी दले व पोलिसांना उपयुक्तच ठरू शकतील.

छत्तीसगढमधील सुकमा जिल्हय़ात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात  केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) २५ जवान शहीद झाले. जवानांचे बळी घेणाऱया माओवाद्यांविरोधात देशात संतापाची लाट असून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरते आहे. माओग्रस्त भागात पोलीस आणि जवानांकडून नेमक्या कोणत्या चुका होतात, हा खरा प्रश्न आहे. सगळय़ात महत्त्वाचे असे की, सीआरपीएफला गेल्या दोन महिन्यांपासून पूर्ण वेळ प्रमुखच नव्हता. सीआरपीएफचे महासंचालक के. दुर्गाप्रसाद हे २८ फेब्रुवारीला निवृत्त झाले. त्यानंतर अतिरिक्त महासंचालक सुदीप लखटकिया यांच्याकडे महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार होता. आता या नरसंहारानंतर सरकारने या पदावर नियुक्ती केली आहे. देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल असलेल्या सीआरपीएफचे ३८ जवान या काळात हुतात्मा झाले तर गेल्या पाच वर्षांत देशभरात नक्षली हल्ल्याच्या ५ हजार ९६० घटना झाल्या असून यात ४५५ जवान शहीद झाले व ५८१ माओवाद्यांचा खात्मा झाला आहे.

सरकारी आकडेवारी पाहिली तर प्रत्येक वर्षी नक्षली हल्ल्यांमध्ये ५५० ते ७५० सामान्य आदिवासी मारले गेले. हिंदुस्थानामध्ये २०१४ पर्यंत माओवादी हिंसाचारात ५५० ते ७५० नागरिक मारले जायचे. मात्र मोदी सरकार आल्यापासून हा हिंसाचार ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. एवढेच नव्हे तर मध्य हिंदुस्थानच्या ४० टक्के भूभागावर माओवाद्यांचा प्रभाव होता. आता तो २० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. म्हणजे माओवाद्यांना जंगलाच्या आत ढकलण्यात आले आहे. मात्र तरीही शस्त्रधारी माओवाद्यांची संख्या काही कमी झालेली नाही.

खरा प्रश्न माओवाद्यांना प्रत्युत्तर देण्यात पोलीस, अर्ध सैनिकी दले कुठे कमी पडतात हा आहे. त्याचा याचा अभ्यास होऊन हल्ले थांबवण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. छत्तीसगढचे माजी पोलीस महासंचालक विश्वरंजन म्हणतात की, नक्षली तळांवर लष्कराच्या तोडीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अर्ध सैनिकी दलाच्या व्यूहनीतीची माओवाद्यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे माओवादी यशस्वी ठरतात. माओवादी प्रत्येक चकमकीचे विश्लेषण अतिशय बारकाईने करत असतात. मात्र असे विश्लेषण करणारी कोणतीही यंत्रणा पोलिसांकडे नाही. त्यामुळेच हल्ला नेमका कसा झाला आणि कोणत्या प्रकारे भविष्यात हल्ले होऊ शकतात, याचे काटेकोरपणे विश्लेषण पोलिसांकडून होत नाही. विश्वरंजन यांचे हे विधान चुकीचे आहे. विश्लेषण करणे हे काम वरिष्ठ नेतृत्वाचे असते.

सुकमामध्ये महामार्गाची उभारणी चालू आहे आणि कामगारवर्गाला सुरक्षा देण्यासाठी हे सीआरपीएफ तिथे तैनात करण्यात आलेले आहेत. अशा भागात घनदाट अरण्य असून दुर्गम भागात गावे-वस्त्या वसलेल्या आहेत. तिथे नक्षली दडी मारून बसलेले असतात. ते गावकरी आदिवासींना धमकावून आडोसा घेतात आणि प्रसंगी त्यांनाच ओलिस ठेवून हल्ले करतात वा निसटतातही. अशा गडबडीत त्यांच्या गोळीने कोणी आदिवासी गावकरी मारला गेल्यास माफ आहे, पण कुणा संशयिताला सुरक्षा जवानांकडून मरण आले, तर सुरक्षा कर्मी गुन्हेगार ठरवला जातो. कुठल्याही गणवेशात नसलेले व गावकऱयांसारखे दिसणारे नक्षली हुडकून त्यांचा खात्मा करणे सोपे नाही, पण सुरक्षा दलांनी तेच काम करावे असा दंडक आहे. नक्षली युद्ध खेळतात आणि पोलीस आणि अर्ध सैनिकी दले मात्र शांतता नांदवण्याचे काम करतात. युद्धात कुठले नियम नसतात. मारणे आणि जिंकणे इतकेच साध्य असते. ते नक्षलींसाठी आहे आणि सुरक्षा कर्मींना मात्र अनेक प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

गुप्तचर विभागाचे अपयश हे अशा नक्षली हल्ल्यांसाठी कारणीभूत ठरत आले आहे. नक्षलींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांच्या विशेष शाखेतील मोठी टीम या भागात सक्रिय असते. पण या विभागातील अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि कर्मचाऱयांची बदली झाल्याने पुरेशी माहिती मिळण्यात अपयश येत आहे. कारवाई करण्यापूर्वी गुप्तहेराचे जाळे पूर्णपणे तयार पाहिजे. सलवा जुडमचे जुने सदस्य, शरण आलेले माओवादी, माओवाद्यांच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या कुटुंबीयाचे सदस्य, दलममधून पळून आलेले सदस्य, एका दलमची माहिती दुसऱया प्रतिस्पर्धी दलमकडून मिळवणे असे करून चांगली माहिती मिळवली जाऊ शकते.

सुरक्षा दलांची हालचाल रात्रीच्या वेळेस वस्ती आणि गावापासूनच्या लांबच्या पायवाटांनी व्हायला पाहिजे. आत जायचा आणि बाहेर यायचा रस्ता वेगळा हवा. आराम करण्याकरिता थांबल्यास त्यांनी स्वसंरक्षणासाठी तयार असले पाहिजे. सामान्य नागरिकांत मिसळून राहणाऱया माओवाद्यांना माहितीच्या आधारावर कमांडो रेड मारून पकडावे लागेल. माओवादी नेतृत्वाचा, विचारवंताचा कणा मोडावा लागेल.

नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा करणारे, अन्नधान्य दारूगोळा, पैसा पोहोचवणाऱया दलालांचा शोध घ्यावा लागेल. सैनिकी कारवाई करून माओवाद्यांचा, शस्त्रधाऱयांचा खात्मा केला जावा. आपली जास्तीत जास्त संख्या एकत्र करून वेगाने कारवाई करावी लागेल. पोलीस अधिकाऱयांनी केबिनमध्ये बसून नव्हे तर मैदानात उतरून नेतृत्व करावे. वरिष्ठ नेतृत्वाने लढण्यामध्ये (Leading From Front) भाग घेतला पाहिजे. शस्त्रधारी कारवायांसोबतच विकासकामे युद्धपातळीवर सुरू केल्यास त्याचा सामान्य आदिवासींना फायदा होईल. या गोष्टी निश्चित धोरण म्हणून अमलात आणाव्याच लागतील. तरच आपण माओवादाचा खात्मा करू शकू.

आपली प्रतिक्रिया द्या