कोलकात्यात संघाच्या कार्यालयावर नक्षलवाद्यांचा हल्ला

सामना ऑनलाईन । मुंबई

पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर आज नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोलकाता येथील कार्यालयावर हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी कार्यालयावर जोरदार दगडफेक केली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालेले नाही. हल्लेखोर हे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.

बुधवारी संध्याकाळी काही महिला या संघाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत होत्या. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी कार्यालयावर दगडफेक सुरू केली. सुदैवाने पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत सर्वांना पिटाळून लावले. त्यामुळे मोठा हल्ला टळला. मात्र या हल्ल्यात संघाच्या कार्यालयाचे नुकसान झाले आहे.

मंगळवारी कोलकाता येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. भाजप, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे कार्यकर्ते यावेळी भिडले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक व वाहनांची जाळपोळही करण्यात आली होती.