एनसीबीचे अधिकारी बनले रिक्षा ड्रायव्हर, नालासोपारा आणि ठाण्यात एनसीबीची कारवाई

प्रातिनिधिक फोटो

मीरा रोड परिसरात राहणाऱ्या ड्रग्ज तस्कर सुफरन लकडावालाच्या मुसक्या आवळण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी रिक्षाचालक बनले. सहा तास फिल्डिंग लावून एनसीबीने सुफरनला ड्रग्जसह गजाआड केले. सुफरनकडून ड्रग्ज जप्त केल्यानंतर एनसीबीने नालासोपारा येथे कारवाई करून ड्रग्ज पेडलर एडविन ओकेरेकेला अटक केली.

एनसीबी मुंबई युनिटने गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात कारवाईचा धडाका सुरूच ठेवत ड्रग्ज माफियांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. नुकतेच एनसीबी मुंबई युनिटने दक्षिण मुंबईत ड्रग्जच्या धंद्यात सक्रिय असलेल्या चिंकू पठाण टोळीला चांगला दणका दिला होता. एक जण हा ड्रग्जच्या धंद्यात सक्रिय असून  तो सध्या मीरा रोड येथे राहत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी मीरा रोड परिसरात सापळा रचला. मंगळवारी रात्री एनसीबीचे पथक मीरा रोड येथे गेले. त्याला पकडण्यासाठी एनसीबीचे अधिकारी रिक्षाचालक बनले. सुफरन हा रात्रीच्या वेळेस ड्रग्ज देण्यासाठी बाहेर पडत असायचा. त्याला पकडण्यासाठी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सहा तास फिल्डिंग लावली होती. अखेर रात्री ड्रग्ज देण्यासाठी सुफरन हा घराबाहेर पडला. त्याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन अटक केली. सुफरनच्या चौकशीत एडविनचे नाव समोर आले. एडविन हा नालासोपारा येथे राहत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर नालासोपारा येथून एनसीबीने एडविनला अटक करून त्याच्याकडून एमडी आणि कोकेन जप्त केले. ड्रग्ज तस्करी प्रकरणी सुफरन आणि एडविनविरोधात एनसीबीने गुन्हा नोंद करून त्या दोघांना अटक केली.  त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांना 12 जुलैपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

ड्रग्ज देण्यासाठी जायचा विमानाने

सुफरन वर्षभर ड्रग्जच्या धंद्यात आहे. तो मुंबई आणि दिल्ली येथील काही नायजेरियन तस्करांकडून ड्रग्ज घेत असायचा. सुफरन हा ड्रग्ज देण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानात विमानाने प्रवास करत असायचा. विमानतळावर उतरल्यावर तो खासगी टॅक्सीने उर्वरित प्रवास करायचा. जेणेकरून त्याला एनसीबीचे अधिकारी पकडणार नाहीत असे त्याला वाटत असायचे. त्याने आतापर्यंत किती जणांना, कधी आणि कुठे जाऊन ड्रग्ज दिले होते त्याचा तपास एनसीबी करत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या