साडेतीन कोटींचा गांजा जप्त, आंतरराज्य ड्रग्ज तस्करी करणारी टोळी 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटने सोलापूर -मुंबई महामार्गावर कारवाई करून साडेतीन कोटी रुपयाचा गांजा जप्त केला आहे. ड्रग्ज तस्कराने ती गांजाची पाकिटे मुंबईत आणण्यासाठी खासगी वाहनाचा वापर केला होता. गांजा तस्करीप्रकरणी एनसीबीने दोघांना ताब्यात घेतले आहे.

आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून खासगी वाहनांतून महाराष्ट्रात गांजा येत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीच्या अधिकाऱयाने सोलापूर-मुंबई महामार्गावर दोन दिवस फिल्डिंग लावली. एनसीबीने एका गाडीला थांबवले. त्या गाडय़ाच्या डिकीची तपासणी केली असता त्यात प्लॅस्टिकची पाकिटे दिसली. त्या पाकिटाबाबत चालकाला विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

 एनसीबीच्या अधिकाऱयाने त्या पाकिटाची तपासणी केली असता त्यात गांजा होता. त्या गाडीतून गांजाची 95 पाकिटे जप्त केली. त्या पाकिटात सुमारे 286 किलो गांजा असून त्याची किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये आहे.गांजाची तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी असून ते आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून महाराष्ट्रात गांजा आणत होते. या आंतरराज्य टोळीत मुंबईतील 20 ड्रग्ज पेडलरचा समावेश असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. गांजा तस्करीप्रकरणी दोघांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे.