दुग्धजन्य पदार्थ बनवणारी ‘क्वालिटी’ बंद होणार

दूध पावडर, बटर चीजसह अन्य दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणारी क्वालिटी लिमिटेड ही कंपनी आता बंद होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आर्थिकदृष्टय़ा कर्जबाजारी असलेल्या क्वालिटी पंपनीच्या खरेदीसाठी हल्दीराम स्नॅक्सने प्रस्ताव दिला होता, मात्र तो विक्री व्यवहार पाहणाऱ्या कमिटीने फेटाळला आहे. त्यामुळे नॅशनल पंपनी लॉ ट्रिब्युनलने क्वालिटी कंपनी बंद करून मालमत्ता विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

दुधापासून दुग्धजन्य पदार्थ बनवून परदेशात निर्यात करणाऱ्या क्वालिटी लिमिटेड कंपनी 1992 मध्ये सुरू झाली आहे. कंपनी कर्जबाजारी झाली असून जवळपास 1900 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे एनसीएलटीने क्वालिटीला दिवाळखोर जाहीर करण्याची प्रक्रिया डिसेंबर 2018 मध्ये सुरू केली होती. दरम्यान, हल्दीराम स्नॅक्स आणि पायोनियर सिक्युरिटीने एकत्र येत 145 कोटी रुपयांचा क्वालिटीच्या खरेदीचा प्रस्ताव दिला होता, मात्र कंपनीचे देणे जास्त असल्याने विक्री व्यवहार पाहणाऱ्या कमिटीने सदरचा प्रस्ताव फेटाळला आहे. दरम्यान, खरेदीबाबतचा एकच प्रस्ताव असल्याने एनसीएलटीनेही कंपनी बंद करून देणी भागवण्याची कार्यवाही सुरू करण्याबाबत बजावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या