माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा वांद्र्यात गोळ्या घालून खून करण्यात आला आहे. संपूर्णपणे गृहखात्याचे अपयश आहे असे म्हणत अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. तसेच पोलिसांनी सिद्दीकी यांना मिळणाऱ्या धमक्या वेळीच गांभीर्याने घेतल्या असत्या तर सिद्दीकी वाचले असते असेही मिटकरी म्हणाले
इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. मिटकमी म्हणाले की बाबा सिद्दीकी यांची हत्या म्हणजे गृहविभागाचे आणि मुंबई पोलिसांचे अपयश आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची अशीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. भायखळ्यातही अजित पवार गटाच्या नेत्याची हत्या करण्यात आली होती.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे पक्षाला जबर धक्का बसल्याचे मिटकरी म्हणाले. मुंबईत सुरक्षेची काय अवस्था आहे याचे हे सिद्दीकी यांच्या हत्येमुळे समोर आले आहे. एखाद्या सामान्य माणसाच्या बाबतीत असे काही झाले असते तर समजण्यासारखी गोष्ट आहे, पण सिद्दीकी माजी मंत्री होते आणि त्यांची हत्या झाली. हे संपूर्णपणे गृहविभागाचे अपयश आहे असे मिटकरी म्हणाले. तसेच पोलिसांनी वेळीच बाबा सिद्दीकी यांना मिळणारी धमकी गांभीर्याने घेतली असती तर त्यांचा जीव वाचला असता. तसेच सिद्दीकी यांच्या जाण्याने अजित पवार यांचा जवळचा सहकरी गेला असेही मिटकरी म्हणाले.