यापूर्वी न्यायालयाने ताशेरे ओढले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय, अजित पवार यांचा एकनाथ शिंदे यांना टोला

राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केल्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर न्यायालय ताशेरे ओढते हे राज्याच्या गौरवशाली परंपरेसाठी शोभनीय नाही अशी टीका करतानाच, यापूर्वी न्यायालयाने ताशेरे ओढले तेव्हा नैतिकता पाळून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

सहकार मंत्री अतुल सावे यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरभरती करण्याचा आदेश दिला होता; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आदेशाला स्थगिती दिली होती. यावरून न्यायालयाने संबंधित खात्याच्या मंत्र्याच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा कोणताही विशेषाधिकार मुख्यमंत्र्यांना नाही, असे ताशेरे ओढले होते.

या महत्त्वाच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः उत्तर न देता मंत्र्यांनी उत्तर देताच अजित पवार संतापले. यापूर्वी ज्या-ज्या वेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर न्यायालयाने ताशेरे ओढले त्या वेळी नैतिकता पाळत मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिल्याची आठवण त्यांनी सरकारला करून दिली.