…म्हणूनच वरिष्ठांनी मला गृहमंत्रीपद दिले नसावे; अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे स्पष्टवक्तेपणासाठी आणि त्यांच्या खास मिश्कील टीका-टिप्पणीसाठी ओळखले जातात. अशीच मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी पुण्यातील एका सभेत पुन्हा केली आहे. पुणे शहर कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी सरकार असताना गृहमंत्रीपद मागितले होते. मात्र, वरिष्ठांनी आपल्याला गृहमंत्री पद दिले नाही, असे सांगत त्यावर मिश्कील भाष्य केले.

राज्यात सरकार येताच काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याला गृहमंत्री बनण्याची विनंती केली होती. यासंदर्भात अजित पवार म्हणाले, “मला उपमुख्यमंत्री बनवल्यानंतर मी वरिष्ठांकडे गृहखात्याची मागणी केली होती. मात्र, अनिल देशमुख यांना गृहमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर मी पुन्हा मागणी केली. तेव्हा दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्री बनवण्यात आले. कदाचित वरिष्ठांना वाटत असेल की याला गृहमंत्री बनवले तर हा आपलंही ऐकणार नाही, त्यामुळे मला गृहखातं दिलं नसेल”, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली. अजित पवारांच्या या मिश्कील वक्तव्यानंतर सभागृहात हशा पिकला.

मला जे योग्य वाटत, तेच मी करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता जरी चुकला तरी त्याला माफी नाही. माझ्याकडे सर्वांसाठी सारखा नियम आहे. एखादा कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा असेल. मात्र, तोच जर चुकत असेल तर त्याला पाठिशी घालण्यात अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.