नगरमध्ये पोलिसाचे अपहरण करून मारहाण; राष्ट्रवादी, बसपाच्या नगरसेवकाला अटक

सामना प्रतिनिधी । नगर

पोलिसाचे अपहरण करून मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील फरार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सुनील त्र्यंबके याला अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ सोमवारी सायंकाळच्या सुमारास महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती बसपा नगरसेवक मुदस्सर शेख यालाही अटक करण्यात आली आहे. तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सर्जेपुरा परिसरात माजी नगरसेवक आरिफ शेख व स्थायी सभापती मुदस्सर शेख यांच्या दोन गटांमध्ये महापालिका निवडणूक वादातून हाणामारी झाली होती. या गुन्ह्यात मुदस्सर शेख याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शेख फरार होता. सोमवारी सायंकाळच्या सुमारास तोफखाना पोलिसांनी त्यांच्या अटकेची कारवाई केली आहे.

सुनील त्र्यंबके याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने पोलीस कर्मचार्‍यास त्यांच्या राहत्या घरून दुचाकीवर बळजबरीने बसवून संपर्क कार्यालयात आणले. त्यानंतर नगरसेवक त्र्यंबके व त्याच्या साथीदारांनी सदर पोलीस कर्मचाऱ्यास लाकडी दांडके, लोखंडी गजाने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत सदर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. या गुन्ह्यात त्र्यंबके याला दुपारी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. या हत्येची घटना ताजी असतानाच आणखी एका नगरसेवकाला अटक केली आहे त्यामुळे दिवसभरात शहरातील दोन नगरसेवकांवर अटकेच्या कारवाईची चर्चा होती.