पवारांची गुगली! मुंडे-क्षीरसागरांवर मोठी जबाबदारी?

उदय जोशी, बीड

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण याची घोषणा दस्तुरखुद्द शरद पवार हे आज पुण्यात करणार आहेत. पवार कोणती गुगली टाकणार याकडे सर्वाचे लक्ष लागले असतांना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर पक्षवाढीसाठी मोठी जबाबदारी टाकली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीतील मराठा राजकारण करत राज्यातील ओबीसीचा चेहरा पुढे करत ओबीसी मतांना आकर्षित करण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत डावपेच आखले जात आहेत. राज्यात हल्लाबोल करत भाजपावर कडाडून टीका करणारे धनंजय मुंडे सध्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. जयंत पाटील की धनंजय मुंडे या बाबत राष्ट्रवादीत काथ्याकूट सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतील ओबीसीचे दुसरे मोठे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्यावरही मोठी जबाबदारी टाकली जाण्याची शक्यता आहे.

आठवडाभरापूर्वीच शरद पवार – जयदत्त क्षीरसागर यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजत आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ सध्या कारागृहात आहेत. ती जागा भरून काढण्यासाठी क्षीरसागरांना चुचकारले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर नाराज आहेत. या नाराजीतून त्यांची भाजपासोबतची सलगी वाढली आहे. या सलगीला खीळ देण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. बीड जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यातच भाजपाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी नवी खेळी आखत आहे. याचाच परिपाक म्हणून धनंजय मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यावर पक्ष मोठी जबाबदारी टाकू शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.