… तर काही दिवसात फोल्डिंगचे रस्ते पाहायला मिळतील, जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला टोला

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका रस्त्यावर पॉलिथिन पन्नीवर डांबरीकरण करण्यात आल्याने त्यावरचे डांबरीकरण अक्षरश: हाताने खेचून निघत असल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात येणार सुमार कामाची पोलखोल झाली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर उपरोधिक टीका केली आहे.

”महाराष्ट्र सरकारने “भ्रष्टाचारी तंत्रज्ञानात” अल्पावधित मोठी प्रगती केली आहे.सत्ता आल्यानंतर अवघ्या 10 महिन्यात जगात पहिल्यांदा “फोल्डिंगचे रस्ते” बनवण्याच तंत्रज्ञान यांनी विकसित केलं आहे. हे असंच चालू राहिलं तर काही दिवसातच आपल्याला घडी घालून ठेवायचे रस्ते देखील पाहायला मिळतील,असा मला विश्वास आहे” असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे. त्यांनी या सोबत त्या रस्त्याचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हस्तपोखरी -कर्जत या रोडच्या डांबरीकरणाचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. या रोडच्या कामात कंत्राटदारांनी चक्क डांबरीकरणासाठी पॉलिथिन पन्नीचा वापर करून त्यावर डांबरीकरण केले आहे. हा प्रकार गावकर्‍यांनी उघडकीस आणला असून संबंधीत कंत्राटदाराचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. कंत्राटदार व संबंधीत अधिकार्‍यांविरोधात गावकर्‍यांनी रोष व्यक्त केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.