मंदिरात पुजाऱ्यांनीही उघडेबंब, अर्धनग्न बसू नये; ड्रेसकोड संदर्भात छगन भुजबळ यांनी मांडली भूमिका

chhagan-bhujbal

नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी मंदिरात ड्रेसकोड लावण्याचा विचार सुरू असल्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. ड्रेसकोडला आपला विरोध नाही मात्र तो सगळ्यांना असतावा, पुजाऱ्यांनी देखील उघडे बसू नये, त्यांनीही सदरा घालावा, असं भुजबळ म्हणाले.

नाशिक येथे बोलताना ‘ड्रेसकोड वैगरे ठीक आहे. मंदिरात प्रवेश करताना निटनेटके कपडे असावेत हे मी समजतो. पण त्याचा अतिरेक नको आणि सगळ्यांनी नीट नेटके कपडे घालायचे असतील तर आतामध्ये जे उघडे बंब असतात ना पुजारी वैगरे त्यांनी सुद्धा सदरावैगरे घालावा. गळ्यात माळ घातली असेल तर आपल्याला कळेल की ते पुजारी आहेत. ते सुद्धा अर्धनग्न नसतात का? त्यांनी सुद्धा सदरा घालावा’, अशी स्पष्ट भूमिका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे.

शिवराज मुद्रा झाकून, सावित्रीबाई-अहिल्याबाईंचे पुतळे हटवून जयंती करणे दु:खदायक…

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवराज मुद्रा झाकून तेथे वीर सावरकरांचा पुतळा ठेवण्यात आला होता. तर राजमाता अहिल्याबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केले गेले होते. यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. या दरमान्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शिवमुद्रा झाकून आणि सावित्रीबाई-अहिल्याबाईंचे पुतळे हटवून जयंती करणे दु:खदायक असल्याचं म्हटलं आहे.

नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना ‘महाराष्ट्रात सदनात जयंती साजरी करायला माझा विरोध नाही. परंतु याठिकाणी शिवराज मुद्रा लावली आहे ती झाकून सावरकर यांचा पुतळा लावला गेला. तिथेच छोट्या चौकात दोन पुतळे आहे त्यात राजमाता अहिल्याबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केले गेले. ही घटना मनाला दुःख देणारी आहे’, अशा भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

‘महाराष्ट्र सदनात मोठ्या हॉलची व्यवस्था असतांना कार्यक्रम तिथे का घेण्यात आला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे व हा मूर्खपणा कुणी केला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पुतळे हटविण्याचे काम का केले जाणीवपूर्वक हे केले का हे शोधले पाहिजे व त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आता लोकतंत्र आहे की मनुतंत्र आहे?

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, या सोहळ्याबद्दल अतिशय वाईट वाटले. पहिल्या संसद भवनाच्या वेळी स्वातंत्र्याचे लढव्यये होते. आता मात्र उघड बंब माणसं होती. त्यांच्या मध्येच पंतप्रधान मोदी उभे होते. या सोहळ्यावर पवार साहेब म्हणाले ते खरे आहे. या धर्मकांड मध्ये सहभागी झालो नाही याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात लोकशाही व्यवस्था आहे, राजव्यवस्था नाही. लोकशाहीत जनता राजा आहे. आता मात्र लोकतंत्र आहे की मनुतंत्र आहे ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करत मोदींनी जे केले ते मनाला वेदना देणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असा सोहळा राम मंदिर शिव मंदिरात ठीक होता पण हे लोकशाहीच्या मंदिरात अपेक्षित नव्हता अशी टीका त्यांनी केली.

निवडणुकीसाठी आम्ही तयार!

राज्यातील निवडणूक घेण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की आम्ही निवडणुकीला तयार आहोत. कुठलाही राजकीय पक्ष कायम तयार असतोच. कर्नाटक मध्ये जे पानीपत झाले ते पाहता ते एकत्रित निवडणुकांचे पाऊल उचलतील असे वाटत नाही.

बँक पूर्वीसारखी होत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ नये…

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, नाशिकची बँक सर्वात मोठी होती तर देशातील दुसऱ्या नंबरची बँक होती. दिवसाढवळ्या बँक काही लोकांनी लुटली. या बँकेवर प्रशासक येण्यासाठी मी प्रयत्न केला. बँक पूर्व पदावर यायला आणखी वेळ लागेल. आजशेतकऱ्यांना खाजगी बँकांकडे जावे लागते आहे. स्वाहाकारी नेत्यांनी बँकेची वाट लावली. याबाबत जनतेने आवाज उठविला पाहिजे. बँक पूर्वीसारखी होत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ नये असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अजित पवार पुण्यातून आऊट झाले का?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या निवडीबद्दल ते म्हणाले की, काही लोकांकडून गैरसमज पसरवला जात आहे. एकीकडे पुण्यात शेळकेंना जबबादारी दिली म्हणून अजित पवार यांना बाजूला केले का? असा सवाल करत नवीन लोकांवर जबाबदारी दिली जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी गुन्हेगारी कंट्रोल केली पाहिजे!

नाशिक शहरातील गुन्हेगारीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पोलिसांनी गुन्हेगारी रोखली पाहिजे. पोलिसांना कोण रोखतंय? असा सवाल उपस्थित करून पोलिसांचा जरब नाहीये.मुंबई पुण्यासारखं नाशिक शहर मोठ नाही. पोलिसांनी गुन्हेगारी कंट्रोल केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.