विरोधात बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, छगन भुजबळ यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

देशाला अनेकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले. त्यातून प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र या अधिकारावर गदा आणण्याचे काम सध्या सुरु असून विरोधात बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संगमनेर येथे स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. आण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त प्रेरणादिन व पुरस्कार सोहळा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग,उल्हासदादा पवार, डॉ.आ.ह.साळुखे, दिलीपराव देशमुख, डॉ.सुधीर भोंगळे, आमदार सर्वश्री लहू कानडे, हिरामण खोसकर, डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

देशात अनेक पक्ष कार्यरत आहे. त्यांचे अध्यक्ष कोण आहे कोण होणार याबाबत कधी जास्त चर्चा होत नाही. मात्र काँग्रेसचे अध्यक्ष कोण होतंय यावर अधिक चर्चा का होते यामध्ये विरोधकांना असलेली काँग्रेसची भिती आहे. कारण काँग्रेसचा हा नेहरू गांधी परिवाराचा इतिहास आहे. गांधी कुटुंबातील सदस्याने या देशासाठी बलिदान दिले असून देशाच्या विकासात त्यांचे महत्वपूर्ण असे योगदान आहे. तरी देखील काँग्रेसवर नेहमीच घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र काँग्रेस हा घराणेशाहीचा नाही तर बलिदानाचा इतिहास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, देशात अनेक महत्वपूर्ण संस्थांची निर्मिती नेहरूंनी केली. त्यातील अनेक संस्था आज विकल्या जात आहे असे सांगत निर्माण करण्यात हुशारी लागते मात्र विकण्यास काय लागतं? असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.