नगर दुहेरी हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांना अटक

सामना ऑनलाईन । केडगाव

शिवसेनेचे नगर उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे या दोघांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत आमदार अरुण जगताप आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, संदीप गुंजाळ,  विजयी उमेदवार विशाल कोतकरचे वडील बाळासाहेब कोतकर, भानुदास कोतकर उर्फ बीएम  यांनाही अटक करण्यात आली आहे. या आरोपींसह ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी उघड झालेल्या या हत्या प्रकरणातील आरोपी संदीप गुंजाळ रात्री सव्वा आठच्या सुमारास पाने पोलीस स्थानकात स्वत:हून हजर झाला होता.

शनिवारी सायंकाळी शिवसेनेचे नगर उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. केडगाव येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली. या हत्येनंतर संतप्त शिवसैनिकांनी गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. शिवसैनिकांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी शिवसैनिकांनी नगर-पुणे महामार्गावर रास्तारोको केला. शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

केडगाव येथील या दुहेरी हत्येनंतर जिल्ह्यामध्ये वातावरण तंग झाले आहे. सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे हत्या करण्यात आलेल्या दोन जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी संभाजीनगरच्या गाठी रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत.