उदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण

1913

राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. उदयनराजे यांच्या भेटीनंतर आमदार शिवेंद्रराजे यांनी देखील वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. उदयनराजे, शिवेंद्र राजे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मंगळवारी सायंकाळी खासदार उदयनराजे वर्षा बंगल्यावर पोहोचले. येथे मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. परंतु मंगळवारी चार वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा मात्र उदयनराजे गैरहजर होते. त्यामुळे नंतर घेतलेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उदयनराजे यांच्यानंतर शिवेंद्रराजे यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवेंद्रराजे यापूर्वीच भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे आता उदयनराजे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

उदयनराजे यांची फेसबूक पोस्ट
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती संदर्भात आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पूरग्रस्त भागातील लोकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणेबाबत तसेच लवकरात लवकर त्या ठिकाणचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली, असे या पोस्टमध्ये नमूद केले आहे. यासोबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देतानाचा एक फोटोही आहे.

आपली प्रतिक्रिया द्या