आरक्षणाची मर्यादा 15 टक्क्यांनी वाढवा, शरद पवारांची सूचना

देशपातळीवर सामाजिक आरक्षणाची मर्यादा 15 टक्क्यांनी वाढवून 65 टक्के करावी म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा सुटेल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. ओबीसींच्या कोटय़ात मराठय़ांना वाटेकरी केल्यास ओबीसींमधील गरीब लोकांवर अन्याय होईल, तसे केल्यास वाद होतील आणि मराठा-ओबीसी वाद निर्माण करणाऱ्यांना आमचा पाठिंबा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी जळगाव दौऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर स्वाभिमानी सभेत बोलतानाही त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमार दुर्दैवी होता असे सांगतानाच लाठीमाराचे आदेश नेमके कुणी दिले हे सरकारने स्पष्ट करावे, असे शरद पवार म्हणाले.

काही नेते कायद्यापेक्षा मोठे झालेत!

आजकाल काही नेते निवडणूक आयोगापेक्षा मोठे झालेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाबद्दल व चिन्हाबद्दल परस्पर न्यायनिवाडा देऊ लागले आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरांवर निशाणा साधला.

मोदींनी फक्त फोडाफोडी केली

सत्तेत आल्यानंतर गेल्या नऊ वर्षांत नरेंद्र मोदी यांनी काय केले? असा सवाल उपस्थित करतानाच, मोदींनी फक्त इतर राजकीय पक्षांच्या पह्डापह्डीचे काम केले, त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी पह्डली, असा हल्लाही शरद पवार यांनी चढवला. लोकांनी दिलेली सत्ता लोकांसाठी वापरण्याऐवजी मोदींनी सीबीआय, ईडीच्या माध्यमातून खोटे खटले दाखल करण्याचे काम केले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

माफी म्हणजे गुह्याची कबुली,फडणवीस, आता राजीनामा द्या!

‘देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यातील लाठीमाराबद्दल मराठा समाजाची माफी मागितली. याचा अर्थ त्यांनीच आदेश दिले होते. आपल्या गुह्याची त्यांनी जाहीर कबुलीच दिली असून आता त्यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणीही शरद पवार यांनी केली. गोवारी समाजाच्या मोर्चादरम्यान झालेल्या दुर्घटनेत 113 जणांचा मृत्यू झाला होता तेव्हा कोणी राजीनामा दिला नव्हता, असा आरोप फडणवीसांनी केला होता. शरद पवार यांनी या आरोपांचा समाचार घेतला. गोवारींच्या मोर्चावर लाठीमार झाला नव्हता तर चेंगराचेंगरी झाली होती, पण त्यावेळी त्या खात्याचे मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता, असे पवार म्हणाले. मुंबईत अशी घटना घडली होती तेव्हा आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता, याचीही आठवण यावेळी शरद पवार यांनी करून दिली.

‘इंडिया’ नावावर केंद्राला आक्षेप का?

मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर भाजपा नेतृत्व अस्वस्थ आहे अशी टीका करतानाच, संविधानातून इंडिया हे नाव कुणीही वगळू शकत नाही, असेही शरद पवार यांनी यावेळी बजावले. ’इंडिया’ या नावावर केंद्राला आक्षेप का, असा सवालही त्यांनी केला.

पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर

राज्यात अनेक जिह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सरकारने पिण्याच्या पाण्याचे तातडीने नियोजन केले पाहिजे, असे शरद पवार यावेळी म्हणाले. चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याचे टँकर, धरणातील पाणीसाठय़ाच्या नियोजनाकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले. सत्तेवर असलेल्या भाजपाला शेतकऱ्यांच्या दुःखाबद्दल यत्किंचितही आस्था नाही, असेही ते म्हणाले.