रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, ही लेखणीची कमाल

1000

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणे अभ्यासला, तर लक्षात येईल की, ‘छत्रपती’ यांची उपाधी ‘शिवछत्रपती’ हीच होती; ‘जाणता राजा’ ही कधीच नव्हती. ‘जाणता राजा’ हे बिरूद रामदास स्वामींनी छत्रपती शिवरायांना दिले आणि मी हेही स्पष्ट करतो की, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. राजमाता जिजाऊ याच महाराजांच्या गुरू होत्या. छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्त्व जिजाऊंनी घडविले आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

छत्रपती हे जन्माने, कर्तृत्वाने लोकांच्या अंतःकरणामध्ये छत्रपतीच राहतील. तिथे दुसरे कोणी काही म्हणण्याची गरज नाही. मला ‘जाणता राजा’ म्हणा, असे मी कुठे म्हणालो नव्हतो, अशा शब्दांत पवार यांनी सातारा येथेच भाजपचे माजी खासदार उदयन भोसले यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाची उजळणीच घेतली.

‘जाणता राजा’ हा शब्द रामदास स्वामींनी आणलेला आहे, असे सांगून त्यांनी इतिहासाची पाने खुली केली. जे लोक सांगतात की, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, ते खोटे आहे. रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, तर राजमाता जिजाऊच त्यांच्या गुरू होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व जिजामाता यांच्या संस्कारातून घडले, असेही पवार यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला, तर त्या कालखंडामध्ये रामदास स्वामी नव्हते; पण काही लोकांच्या हातात लेखणी होती. त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला घडवण्याचे काम कुणीतरी रामदासांनी केले अशी लेखणीची कमाल कुणीतरी केली आणि आम्ही लोक मानू लागलो की महाराजांचे सगळे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळं आहे, हे खरे नव्हे. महाराजांचे कर्तृत्व हे स्वकर्तृत्व होते. मार्गदर्शन आणि संस्कार मातेचे होते. म्हणून हे महान व्यक्तिमत्त्व या देशाला मिळाले. त्यांना जाणता राजा म्हणायची गरज नाही. छत्रपती हे जन्माने, कर्तृत्वाने लोकांच्या अंतःकरणामध्ये छत्रपतीच राहतील. तिथे दुसरे कोणी काही म्हणण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या