पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पालघरमध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. या सोहळ्यात पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेली एक भली मोठी काचेची फ्रेम भेट देण्यात आली. ही भेट स्वीकारताना स्वत:चा फोटो दिसावा म्हणून महाराजांची मूर्ती असलेली ती फ्रेम पायाजवळ ठेवण्यात आली होती, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. राष्ट्रवादीने याचा व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मिंधे भाजप सरकारला फटकारले आहे.
राष्ट्रवादीने त्यांच्या ट्विटर हँडलवर या सरकारकडून कशा प्रकारे सतत महाराजांचा अपमान केला जातो ते दाखवणारे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात आजचा पालघरचा व्हिडीओ व अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना घातलेल्या जिरेटोपाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून महाराष्ट्राची शान दिल्लीपुढे अबाधित ठेवली. परंतु त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान करून महाराष्ट्राला दिल्लीच्या तख्तापुढे झुकवण्याचं काम राज्यातील या महायुती सरकारने केलं आहे. pic.twitter.com/vrQNSfCkcQ
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 30, 2024
या व्हिडीओसोबत राष्ट्रवादीने एक पोस्टही शेअर केली आहे. ”महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून महाराष्ट्राची शान दिल्लीपुढे अबाधित ठेवली. परंतु त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान करून महाराष्ट्राला दिल्लीच्या तख्तापुढे झुकवण्याचं काम राज्यातील या महायुती सरकारने केलं आहे.” असे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे.
… शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफी
सिंधुदुर्गमधील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रात संतापची लाट उसळली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मालवणमध्ये मोर्चा काढत या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारचा निषेध केला. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी जनतेची माफी मागितली आहे. पालघरमध्ये वाढवण बंदराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आले होते.