शाळा बंद करायला नव्हे तर चालवायला अक्कल लागते, शरद पवारांनी घेतली भाजपची शाळा

1534

शिक्षण हा समाजव्यवस्थेचा कणा असून तो शाळांमध्येच मजबूत होतो. त्यामुळे राज्यात शाळा वाढायला हव्यात, त्या चालवायला हव्यात, पण भाजप सरकारच्या काळात शाळा चालवण्याचा शहाणपणा त्यांनी केला नाही, तर बंद करण्याचा करंटेपणा केला. पटसंख्येचे कारण देत पाच वर्षांत त्यांनी 13 हजारांहून अधिक शाळा बंद केल्या. यावरून शाळा बंद करायला नव्हे तर चालवायला अक्कल लागते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजपला लगावला.

शिक्षक भारतीचे पहिले राज्य अधिवेशन शनिवारी वडाळा येथे मोठय़ा उत्साहात पार पडले. त्यावेळी शिक्षकांच्या प्रश्नावर शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळासह आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. गेली पाच वर्षे सरकार दरबारी आमची कुचंबणा झाली, आम्हाला कोणी वाली नव्हता. पण आता महाविकास आघाडीचे सरकार आल्याने शिक्षकांना न्याय मिळायला हवा अशी मागणी शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी केली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, संजय शेटे, शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे, नवनाथ गेंड, विनोद कडाव यांच्यासह हजारो शिक्षक उपस्थित होते.

माझ्यावर कमळ बघण्याचे संस्कार झाले नाहीत!
राज्यात पाठय़पुस्तक मंडळ झाले तेव्हा नव्या पिढीला विज्ञानाचे आकर्षण कसे वाटेल याची आम्ही काळजी घेतली; पण अलीकडे पहिलीच्या मुलाला शरद कमळ बघ, छगन कमळ बघ, आणखीन काय काय कमळ बघ असे शिकवले जाते, असा चिमटा शरद पवार यांनी भाजपला काढला. तसेच माझी आई स्कूल बोर्डात होती तेव्हा सावित्रीबाई तिचा आदर्श होत्या. त्यामुळे माझ्यावर कमळ बघण्याचे संस्कार झाले नाहीत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

शिक्षण क्षेत्र साफ केले पाहिजे – संजय राऊत
आधीच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत शिक्षणाच्या आयचा घो केला आहे. सन्मानाने काम करणारे शिक्षक आता मजुराप्रमाणे कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. कधी शाळा बंद केल्या, तर कधी अभ्यासक्रमातील धडे बदलून इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दिशा देणारे शिक्षण क्षेत्रच गोंधळून गेले आहे. त्याची दखल घेत आता आपल्याला शिक्षण क्षेत्र साफ करावे लागेल, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न, सरप्लसचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिक्षकाला ताठ मानेने मंत्रालयात आपल्या मागण्या घेऊन जाता आले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तुम्ही विद्यार्थ्यांना धडा देता, आम्ही सरकारलाच धडा शिकवला
विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रश्न सोडवता यावेत म्हणून त्यांना तुम्ही शिक्षक अभ्यासक्रमाचे धडे देता. त्यानुसार राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी पाच वर्षे भाजप सरकारकडे आम्ही पाठपुरावा केला, पण त्यांना प्रश्नच समजत नव्हते. त्यामुळेच आम्ही त्यांना धडा शिकवत सत्तेवरून खाली खेचले, असा टोला शरद पवार यांनी भाजपला लगावला.

आम्ही एकत्र नव्हतो तेव्हा रोज सकाळी ‘सामना’ वाचायचो
आम्ही म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा रोज सकाळी प्रथम दैनिक ‘सामना’ वाचायचो. त्यामध्ये आज कोणाला फटकारे मारलेत, कोणाला चिमटे घेतलेत, कुणाला कोपरखळी मारली हे बघायचो. तेव्हा मला प्रश्न पडायचा की कार्यकारी संपादक म्हणून काम करताना संजय राऊत यांना रोज हे कसे सुचते, असे शरद पवार म्हणाले. पण आताच राऊत यांनी भाषण करताना सांगितले की, माझी पत्नी शिक्षिका असून त्याचा मला अभिमान आहे. यावरून त्यांना रोज वेगवेगळे कसे सुचते याची मला उकल झाली असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या