मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसले श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीने फोटो ट्विट करत साधला निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. एकनाथ शिंदे राज्यात नसताना त्यांचा मुलगा व खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे व राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे एका केबिनमधील मुख्य खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. त्या खुर्चीच्या मागे ”महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री” असे लिहलेले आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर काही लोकं उभी असून ते त्यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत.

”खासदार श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरुय.हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर?”, असे ट्विट रविकांत वरपे यांनी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.


बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाऱ्या करण्यात व्यस्त. राज्याचा कारभार मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हाती सोपवला आहे का?, असा सवाल त्यांनी दुसऱ्या ट्विटमधून केला आहे.