राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘मी पवार साहेबांचे बोट धरून राजकारणात आलो’, असे नरेंद्र मोदी सांगतात. पण आजकाल जी परिस्थिती आहे त्यातून मला माझ्या बोटाची काळजी वाटतेय. आपले बोट भलत्याच व्यक्तीच्या हाती दिल्यावर काय होते ते दिसतंय, असा टोला शरद पवार यांनी मोदींना लगावला.
मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवा संवाद कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. हे राज्यकर्ते तुमच्या हिताचे नाहीत, असे सांगत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ज्यावेळी शेती व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर आली. मी शपथ घेतली व घरी आलो, तेव्हा अधिकाऱयांनी पहिली फाईल माझ्यापुढे आणली. देशात अन्नधान्याचा साठा कमी झाल्यामुळे मी फार अस्वस्थ झालो होतो. पण त्यानंतर आपला देश जास्त गहू पिकवणारा देश झाला. आज मात्र अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. परीक्षेत बसणारी मुले दहा दिवस संघर्ष करतात. दारिद्रय़रेषेखालील मुस्लिमांची संख्याही दुर्लक्षित करण्यासारखी नाही, असे पवार म्हणाले.
मोदींचा हात लागेल तिथे उलटसुलट होतंय!
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अस्वस्थ करणारी आहे. 1960 मध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर बसवलेल्या पुतळय़ाला अजून काही झालेले नाही. मात्र सहा महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळला. या पुतळय़ाच्या उद्घाटनाला आले कोण होते, तर नरेंद्र मोदी. त्यांचा हात लागतोय, तिथे काहीना काही उलटसुलट होतेय. पुतळा कोसळल्याबद्दल मोदींनी माफी मागितली आणि लगेच सांगितले की सावरकर यांची माफी मागण्यात आली नाही. विषय काय आणि हे बोलतात काय? असाही टोला शरद पवार यांनी मोदींना लगावला.