
काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्यांना भाजपच्या पहिल्या रांगेत संधी मिळाल्याचे पाहून आपण फारच मागे पडलो आहोत, अशी अस्वस्थता भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. नगर येथे आज जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, नीलेश लंके, संग्राम जगताप, किरण लहामटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँगेसमधून भाजपमध्ये आलेल्यांना पहिल्या रांगेत स्थान मिळत आहे. त्यामुळे आपण फारच मागे राहिलो आहोत, अशी भावना भाजपच्या निष्ठावान कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये होत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत.
‘ईडी’च्या माध्यमातून नेत्यांवर दबाव टाकून भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुमच्याबाबत असेच होत आहे का, असे विचारले असता, सध्या देशात आणि राज्यात हीच पद्धत सुरू झाल्याचे मी ऐकले आहे; पण माझ्याबाबत तसे होणार नाही. लोकांना आता सर्वकाही समजत आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.