राज्यभरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मिंधे सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भिवंडी-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचा सामना करीत प्रवास करावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या याच खड्डेमय प्रवासावरून राष्ट्रवादी काँग्रेसने खरमरीत शब्दांत टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनाच खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करावा लागत असेल तर सामान्य जनतेचं काय? असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला खड्ड्यातून प्रवास करावा लागल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या पोस्टवर ‘मुख्यमंत्र्यांचा लाडका खड्डा’ असे लिहिले आहे.
काय म्हटलंय ट्विटमध्ये?
“मुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाच भिवंडी नाशिक महामार्गावरील खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत असेल, तिथे सर्वसामान्य जनतेचं काय ? ढिसाळ राज्यकारभार करणाऱ्या महायुती सरकारला राज्यातील जनता धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
मुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाच भिवंडी नाशीक महामार्गावरील खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत असेल, तिथे सर्वसामान्य जनतेचं काय ? ढिसाळ राज्यकारभार करणा-या महायुती सरकारला राज्यातील जनता धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही! pic.twitter.com/ViXieFB4Dv
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 12, 2024
भिवंडी-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे सतत होत असलेल्या टीकनेनंतर मुख्यमंत्री या महामार्गाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी भिवंडी शहरातील एका उड्डानपुलावरुन जात असताना मुख्यमंत्र्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांमधून हेलकावे खात मार्गक्रमण करावे लागले. या खड्ड्यांतून सर्वसामान्य जनतेचा वेदनादायी प्रवास यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनुभवला. एरव्ही वाऱ्याच्या वेगाने धावणारा मुख्यमंत्र्यांचा ताफा भिवंडीतील महामार्गावर मात्र बैलगाडीच्या वेगाने पुढे सरकताना दिसत आहे.