शिंदे-फडणवीस सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडले; वेदांता फॉक्सकॉनवरून रोहित पवारांचा हल्लाबोल

‘वेदान्त समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली 1 लाख 66 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. तसेच शिंदे फडणवीस सरकारकडून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यासाठी गेल्या वर्षी जाहीर केलेल्या 76 हजार कोटींच्या धोरणात केंद्र सरकारने अनेक बदल केले असून मर्यादित असलेल्या अनुदानाच्या रकमा वाढविण्याचा अत्यंत महत्वपूर्ण आणि स्वागतार्ह निर्णय घेतला. एकीकडे सेमीकंडक्टर उद्योगाला चालना मिळत असल्याचा आनंद आहे पण दुसरीकडे वेदांत महाराष्ट्रातून गेल्याचं दुःख आहे. महाराष्ट्र सरकारने देऊ केलेल्या सवलती गुजरातपेक्षा 11 हजार कोटींनी जास्त होत्या. तरीही वेदान्त गुजरातला का गेला? हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर केंद्र सरकारच्या सुधारित सेमीकंडक्टर धोरणात मिळत आहे. मविआ सरकार सवलती देण्यात कमी पडलं नाही तर सध्याचं राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडलं, हे सत्य नाकारता येणार नाही, असं म्हणत रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या गोष्टी अंतिम झाल्या होत्या. टॅक्स बेनिफिट, जागेची किंमत आणि इतर सर्व गोष्टी अंतिम झाल्या असताना, सरकार बदलले. कदाचित या सरकारने देखील प्रयत्न केलेले असावेत, पण 5 सप्टेंबर रोजी जेव्हा अग्रवाल हे पंतप्रधानांना भेटले आणि त्यानंतर सगळ्याच गोष्टी बदलायला सुरुवात झाली, असे रोहित पवारांनी म्हटले होतं.

हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर आनंद झाला असता. त्यासाठी जागाही ठरली होती. नव्या पिढीला अधिक संधी मिळाली असती, त्यामुळे तो प्रकल्प येथे होणं गरजेचं होतं. पण हा प्रकल्प गुजरात किंवा देशात कुठेतरी होत आहे याचा आनंद आहे. मी विरोधासाठी विरोधी भूमिका घेणार नाही, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे, असेही ते म्हणाले.