पुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आमदार एक महिन्याचे वेतन देणार – नवाब मलिक

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार एक महिन्याचे वेतन देणार असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

सरकार आपल्यापरीने मदत करेल परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणखी मदत देता येईल का याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब सर्वांशी चर्चा करुन घेत आहेत. त्यामुळे एक- दोन दिवसात नेमकी मदत काय देणार आहे हे पक्षाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल असेही मलिक यांनी सांगितले.

आठ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूराने कोकण, सातारा, सांगली याठिकाणी अपरिमित हानी झाली आहे. दरड कोसळून जवळपास 251 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 100 हून अधिकजण बेपत्ता आहेत. यासह मुंबई, पुणे, अमरावती याठिकाणीही पूरामुळे परिस्थिती अवाक्याबाहेर गेली होती. या नुकसानग्रस्त लोकांना एसडीआरएफच्या नियमानुसार मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूरग्रस्त भागात दौर्याावर आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एनडीआरएफ, नेव्ही, आर्मी यांची मदत घेऊन बचाव कार्य सुरू आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत

या नैसर्गिक आपत्तीत ज्यांचा जीव गेला आहे त्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची घोषणा राज्यसरकारच्यावतीने करण्यात आली आहे. मुंबईत जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांनाही पैसेही वाटप झाले आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

या महापुराने घरं उध्वस्त झाली. शेतकर्यांलचे प्रचंड नुकसान झाले शिवाय शेतकऱ्यांची जनावरेही वाहून गेली. येत्या कॅबिनेटमध्ये यावर निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल असेही नवाब मलिक म्हणाले.

संकट आल्यानंतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन मदत केली पाहिजे, परंतु भाजपचे नेते नको ती भाषा करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे चिरंजीव ट्वीट करुन जी भाषा वापरत आहेत ते अयोग्य असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
नारायण राणे हे पूरग्रस्तठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आम्ही मुख्यमंत्री पदाच्या वेटींगमध्ये आहोत असे वक्तव्य करत आहेत. सर्वांनी संकटकाळात मदत केली पाहिजे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी अशा प्रकारचे वक्त्यव्य करणे योग्य नसल्याचेही मलिक यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या