गलवानच्या संघर्षात 5 सैनिक गमावले! चीनने आठ महिन्यांनंतर कबूल केले अर्धसत्य

गलवान खोऱयात रक्तरंजित संघर्ष घडून आठ महिने उलटल्यानंतर चीनने पहिल्यांदाच या संघर्षाबाबत कबुली दिली आहे. गलवानमध्ये हिंदुस्थानी लष्कराशी झालेल्या चकमकीत पाच सैनिक मारले गेले. यात एक रेजिमेंटल कमांडर आहे, असा खुलासा करीत चीनने सैनिकांची नावे व इतर तपशील उघड केला आहे. गलवानमध्ये चीनचे 40 ते 45 सैनिक मारले गेल्याचा निष्कर्ष याआधी अमेरिका व रशियाने काढला आहे. त्यामुळे चीनची कबुली ‘अर्धसत्य’ मानली जात आहे.

चिनी सैन्याच्या ‘पीएलए डेली’ या अधिकृत वर्तमानपत्रामध्ये चीनने ही कबुली दिली आहे. गलवानमध्ये मारले गेलेल्या सैनिकांना चीनी लष्कराने ‘हीरो’चा दर्जा दिला आहे. काराकोरम माऊंटेनवर तैनात 5 फ्रंटियर अधिकारी आणि सैनिक हिंदुस्थानसोबतच्या संघर्षात मारले गेले. देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याकामी सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा केली गेली आहे, असे सेंट्रल मिलिट्री कमिशनने मान्य केल्याचे चीनच्या सरकारी मीडियाने म्हटले आहे. गलवानच्या संघर्षात क्युई फेबाओ, चेन होंगजुन, चेन जियानग्रॉन्ग, जियाओ सियुआन आणि वांग जुओरन हे सैनिक ठार झाल्याचे चीनने म्हटले आहे.

चीनची उलटी बोंब

  • हिंदुस्थानी लष्कर चीनी सैन्याला मागे हटवण्याचा प्रयत्न करीत होते. यादरम्यान चीनच्या सैन्याने स्टील टय़ूब, लाठय़ा आणि दगडांच्या हल्ल्याला सामोरे जात देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण केले.
  • गेल्या वर्षी एप्रिलपासूनच हिंदुस्थानी लष्कराने मागील कराराचे उल्लंघन केले. आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करून रस्ते आणि पुलांचे बांधकाम केले. हिंदुस्थाननेच जाणूनबुजून तणाव वाढवला.
  • हिंदुस्थानी लष्कराने आधीपासूनच अधिक जवान तैनात केले होते. चर्चेसाठी पुढे गलेल्या चिनी सैनिकांवर हिंदुस्थानने हल्ला केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या