
प्रसिद्ध दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडीज् आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरुद्ध प्राप्तिकर विभागाने जारी केलेला आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
न्या. महेश सोनक व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) योग्य परवानगीशिवाय अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्तांनी हा आदेश काढला असा ठपका ठेवत खंडपीठाने तो रद्द केला.
नव्याने निर्णय घेण्याची मुभा
सीबीडीटी किंवा अधिपृत सदस्याने या प्रकरणाचा पुनर्विचार करावा. कंपनीला बाजू मांडण्याची संधी द्यावी. त्यानंतर सीबीडीटीने तीन महिन्यांत याबाबत योग्य तो निर्णय द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
काय आहे प्रकरण
2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीला प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यास दहा महिन्यांचा उशीर झाला होता. कोरोनामुळे हा उशीर झाला आहे. हा विलंबाचा भार माफ करावा, असे कंपनीचे म्हणणे होते. प्राप्तिकर उपायुक्तांनी ही मागणी फेटाळून लावत अतिरिक्त भार आकारला. तसे आदेश जारी केले. त्याविरोधात कंपनीने याचिका केली होती.