मराठीतील लेखनशिस्त : व्यापक प्रबोधनाची गरज

464

>>डॉ. नागेश अंकुश

भाषा एका विशिष्ट, ठरावीक रीतीने लिहिली जावी, यासाठीच काही नियम, संकेत ठरवले जातात. त्यामुळे भाषेत एकसूत्रीपणा, समानता व शिस्त टिकून राहते. लेखनाला योग्य अशी दिशा मिळते. मराठी व्याकरणाच्या परंपरेला जवळपास दोनशे वर्षे (पाणिनीच्या व्याकरणाला तर सुमारे दोन हजार वर्षांची समृद्ध परंपरा आहे.) तर लेखन नियमांना पाच दशकांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे. तरीही व्याकरणाबद्दलची काहीअंशी अनास्था आणि लेखनविषयक नियमांबद्दलची बव्हंशी अनभिज्ञता आजपावेतो टिकून आहे.

अलीकडे कोण कशावर आक्षेप घेईल, हे सांगता येणे तसे कठीणच. जुने सगळे टाकाऊ आणि नवे कसे सगळे चांगले, अशी चुकीची धारणा आज समाजात पसरत चालली आहे. भाषा आणि साहित्य क्षेत्रात तर अशी मत-मतांतरे अधिकच. असो.
भाषा शुद्ध किंवा अशुद्ध अशी नसते म्हणून ‘शुद्धलेखन’ या शब्दावर अलीकडे आक्षेप घेतला जातो. ‘शुद्ध’ या शब्दाचे पवित्र, निर्दोष, स्वच्छ, फक्त व बरोबर असे अर्थ होतात आणि ‘शुद्धलेखनात’ ‘शुद्ध’ हा शब्द अचूकता/निर्दोष/बरोबर या अर्थाने आलेला दिसतो. त्यामुळे अलीकडे ‘शुद्धलेखन’ या शब्दाऐवजी ‘प्रमाणलेखन’ असा शब्द वापरात येत असलेला दिसतो. (खरे म्हणजे समाजात ‘प्रमाण’ या विशेषणाऐवजी ‘शुद्ध’ हे विशेषण अधिक प्रचलित झालेले होते.)
याअगोदर लेखननियम, लेखनविषयक नियम, लेखनपद्धती, लेखननियमावली हे पर्यायी शब्द वापरात होते. पूर्वीच्या व्याख्येनुरूप ‘लेखननियमांना अनुसरून करण्यात येणारे लेखन म्हणजे शुद्धलेखन’ असे म्हणत. अलीकडील काळात ‘शुद्धलेखन म्हणजे त्या-त्या वेळच्या लेखनविषयक, शिष्टमान्य व व्याकरणसंमत नियमांना अनुसरून केलेले लेखन म्हणजे शुद्धलेखन होय.’

जीवन असो की भाषा – शिस्त महत्त्वाचीच. व्याकरण – लेखन नियमांमुळेच भाषेत शिस्त टिकून राहते. या संकेतांमुळेच लिखाणात एकरूपता, स्थिरता व सुसूत्रता येते. नियमांमुळेच रोजचा भाषाव्यवहार अधिक सुकर – सुलभ आणि सहजही होतो. लेखनसंकेतांमुळेच भाषाव्यवहार आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित होतो. नियमांअभावी भाषेत समानता टिकवली जाऊ शकत नाही.
मराठी साहित्य महामंडळाने तयार केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला – १९६२ मध्ये मान्यता दिली आणि त्यानंतर पुढे दहा वर्षांनंतर म्हणजे १९७२ या वर्षी चार नवीन नियमांची भर घातली आणि अगोदरच्या नियमांतील काही उणिवा दूर करून एकूण अठरा नियम अस्तित्वात आले. आज मराठी साहित्य महामंडळाचे एकूण अठरा (पोटनियम-उपनियमही मिळून जवळपास साठच्या आसपास) नियम आहेत. सदरील नियमांना मान्यता देऊन आणि रूढ होऊन आज पाच-सहा दशके होत आहेत. या नियमांमुळे सगळीकडच्या लेखनात जिथे-जिथे मराठी भाषेतून लेखन होते, तिथे तिथे एकसूत्रीपणा, एकसारखेपणा यायला हवा होता. ही अपेक्षा होती. मात्र शिक्षणव्यवहार, पाठ्यपुस्तके, प्रसारमाध्यमे व लेखनव्यवहाराची क्षेत्रे वगळता सामान्य व्यक्तींना हे नियम आजही समजू शकलेले नाहीत. नियमांचा सर्वदूर असा प्रचार-प्रसार होऊ शकला नाही. विविध स्तरांतील अभ्यासक्रमांतदेखील यावर आधारित चार-दोन गुणांपलीकडे प्रश्न विचारले जात नाहीत. स्पर्धा परीक्षांमध्येही अत्यल्प गुणांसाठी यावर प्रश्न विचारले जातात.

व्याकरणातील विविध घटकांवर आधारित तक्ते व अन्य शै. साहित्य आढळते. मात्र ‘शुद्धलेखन’ या विषयाच्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्याचाच सर्वत्र अभाव असलेला जाणवतो. यासंदर्भात मी लेखन नियमांवर आधारित सर्व नियम समाविष्ट होतील असे ‘चला, अचूक मराठी लिहू या’ या तक्त्यांचे संपादन केले. त्याला आजवर उत्तम असा प्रतिसाद मिळाला. (दोन हजार तक्ते अल्पदरात उपलब्ध करून दिले. असा प्रयत्न यापूर्वी पुण्यातील राणे प्रकाशनाने १९९० च्या दशकात केलेला होता.)

पूर्वी मुद्रिते वाचली जात. त्यामुळे ‘मुद्रितवाचन’ असे म्हटले जाई. तद्नंतर मुद्रितशोधक असा शब्द रूढ झाला. याऐवजी ‘मुद्रित-सल्लागार’ असे म्हणायला हवे. हे काम अतिशय वेळखाऊ, जबाबदारीचे, जिकिरीचे असते. त्याकडे सामान्य काम म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन, मानसिकता बदलायला हवी. या कामाकडे प्रतिष्ठsने पाहण्याची गरज आहे. मजकुरातील चुकांसाठी आधी लिहिणारा, अक्षरजुळणी करणारा आणि नंतर मुद्रितशोधक जबाबदार असतो. बरेचदा अक्षरजुळणी करताना अक्षरे सुटतात. ऱहस्व-दीर्घ मागे-पुढे होतात. त्यामुळे अक्षरजुळणी करताना गांभीर्य असणे आवश्यक आहे. कारण छापील मजकुराआधी जुळणी होते. म्हणून अक्षरजुळणी करण्याअगोदर लिहिलेला मजकूर बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी आणि आपण जुळणी केलेला मजकूर हस्तलिखित मजकुराप्रमाणे आहे का हे पाहावे. कारण लेखक आणि मुद्रितशोधक यांच्यातील हा अक्षरजुळणीकार दुवा असतो.
संभाषण कला अवगत असणाऱयांबरोबरच लेखनप्रभुत्व असणाऱयांसाठीही आज विविध क्षेत्रांत अनेक चांगल्या संधी निर्माण होत आहेत. गरज असते ती कमी अवधीत मोजके, नेमके, प्रभावी व शैलीदार लेखन करणाऱया व्यक्तीची. वर्तमानपत्र व विविध माध्यमे, संपादनक्षेत्र, प्रकाशनक्षेत्र, दूरदर्शन मालिकांसाठी. त्यासाठी लेखन पद्धतशीर व शिस्तबद्ध असावे लागते. मात्र यासाठी वरील कौशल्ये असणारे विद्यार्थी मोजके असतात. आज चांगल्या नामवंत प्रकाशन संस्थेत संपादन करण्यासाठी कुशल व्यक्तीची निकड भासते.

आज जवळपास सर्वच शिक्षणक्रमात जी वस्तुनिष्ठता आली आहे त्याचाही परिणाम होत आहे. मुलांचा संपूर्ण भर वस्तुनिष्ठ प्रश्न पद्धतीवरच असलेला दिसतो. त्यामुळे वर्णनपर लेखनाकडे दुर्लक्ष होत आहे.
आंग्ल पर्यावरणाचाही मराठी लेखनावर परिणाम झाला आहे. मराठी शब्दाऐवजी इंग्रजी शब्द वापरणे हे तथाकथित सवंग मोठेपणाचे मानले जात आहे. (त्यामुळे लहान मुलांना मराठी शब्दाऐवजी इंग्रजीत लवकर समजते, असा काहीसा समज रूढ होत आहे) इंग्रजी स्पेलिंगची अधिक काळजी घेतली जाते तेवढ्या प्रमाणात मराठी लेखनाची घेतली जात नाही. मराठी काय सोपा विषय. यामुळे या विषयाकडे दुर्लक्षच अधिक.
यासंदर्भात खालीलप्रमाणे उपाय करता येतील

z शैक्षणिक साहित्य तयार व्हायला हवे z शाळा, महाविद्यालयांत लेखन शुद्धतेबाबतीत अधिक गांभीर्य असणे गरजेचे. z साहित्य संमेलनामध्ये या विषयावर फारशी चर्चा, परिसंवाद घडताना दिसत नाहीत. असे प्रयत्न व्हावेत. z शुद्धलेखनाचा आग्रह हा भाषा संवर्धनाचा एक भाग म्हणून त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे. z लेखन शुद्धतेबद्दल सर्व स्तरांत व्यापक जागृतीची गरज. त्यासाठी विविध भाषांविषयक उपक्रम राबवायला हवेत. z मराठी विषय घेणाऱयांना विविध चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवे पर्याय शोधणे. z लेखनव्यवहार होणाऱया वृत्तपत्रे, प्रकाशन संस्थेत, अन्य ठिकाणी ‘व्याकरण व लेखन सल्लागार’ असावेत. अशा ठिकाणी संबंधित यंत्रणेने या विषयावरील दर्जेदार संदर्भ उपलब्ध करून द्यावेत. z प्रत्येक शाळा, महाविद्यालयात अन्य मंडळाबरोबरच, समित्यांबरोबरच प्रमाण लेखन समिती असावी. तीत शाळेतील भाषाशिक्षक असावे. (त्यांची जबाबदारी-मजकूर तयार करणे, त्यातील शुद्धता तपासणे इ.) z मराठीच्या शिक्षकासोबतच अन्य विषय शिक्षकांनाही यासंदर्भात प्रशिक्षित करावे. z प्रत्येक शाळा, महाविद्यालयाने ‘प्रमाण लेखन चाचणी’ आयोजित करून त्याबाबतीत विविध उपक्रम राबवावेत. z माजी शिक्षण संचालक गुरुवर्य वि. वि. चिपळूणकरांनी शुद्धलेखनाचे उद्बोधक असे अभियान राबवले होते. या अभियानास सकारात्मक प्रतिसाद लाभला. यासारखे उपक्रम दिशादर्शक ठरतील. z तक्ते, आकाशवाणीतील प्रासंगिक कार्यक्रम, भाषणे, लेख, व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद वर्ग, घडीपट इ. मार्गाने हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता येईल. z रयत शिक्षण संस्थेच्या वतीने काही वर्षांपूर्वी अभिनव अशी ‘शुद्धलेखन कार्यपुस्तिका’ तयार करण्यात आली होती. त्या धर्तीवर अन्य संस्थांनी अशा स्वरूपाचा प्रयत्न करायला हवा.

 

आपली प्रतिक्रिया द्या