मणिपूर भरभक्कम व्हावे

>>ज्ञानेश्वर भि. गावडे<<

ईशान्य हिंदुस्थानात मणिपूर हे छोटे राज्य आहे. २७ लाख वस्ती व २२ हजार चौ. किलोमीटर क्षेत्र असून बहुसंख्य जनता हिंदू आहे. म्यानमार (ब्रह्मदेश), चीन व बांगलादेश अशा देशांशी शेजार आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेसाठी अतिमहत्त्वाचे ठरलेले आहे आणि देशात साक्षरतेच्या प्रमाणात सर्वात जास्त (८५ टक्के) शिक्षित राज्य आहे. त्यामुळे शिक्षित बेरोजगारांची टक्केवारीही मोठी आहे. अगदी पीएच.डी. झालेले बेरोजगार इकडे रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. दुर्दैवाची बाब अशी की, नव्या पिढीला शेजारी देशांनी नशेबाजीची चटक लावून दिलेली आहे. सध्या ‘मणिपूर’ राज्यात फुटीरतावाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. बृहत् नागा राज्यात यावे म्हणून आंदोलनही केले जात आहे. दोन महिन्यांच्या काळात राज्याला जोडणाऱ्या दोन राष्ट्रीय मार्गांवर हिंसक आंदोलन करून मणिपूरला देशापासून वेगळे पाडलेले आहे. जीवनोपयोगी वस्तूंसह पुरविला जाणारा माल रोखलेला आहे. एकदा तर रसद पुरविणारे २५ ट्रक्स ओळीत जाळले गेले होते. म्हणून जनतेसाठी नाइलाजाने एकमेव अशा हवाई मार्गाचा वापर करावा लागला. स्फोटक परिस्थिती पाहून मोदी शासनाने ४८०० अर्धसैनिक दिमतीला पाठविले म्हणून परिस्थिती बऱयापैकी झालेली आहे. अशांत परिस्थितीतही मणिपूरची पाचपैकी एका राज्याची विधानसभा निवडणूक पार पडली. साठ जागांच्या मणिपूर विधानसभेत यापूर्वी एकही आमदार नसताना आताच्या निवडणुकीत तब्बल २१ भाजपचे आमदार निवडून आले आणि ईशान्य राज्यांतील सात भगिनी राज्यांपैकी चौथी मणिपूर ही भाजपप्रणीत झाली. देशपातळीवरून दिसणारा कौल पाहता तेथील नॅशनल पीपल्स पार्टीचे चार, नागा पीपल्स फ्रंटचे चार, तृणमूल काँग्रेस, लोकजनशक्ती, अपक्ष मिळून तेहतीस हा जादुई आकडा पार झाला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष वाय. हेमचंद्र सिंह आणि मुख्यमंत्री एन. वीरेंद्रसिंग यांची भाजपप्रणीत सत्ता आलेली आहे. तीन देशांच्या सीमेवर असणारे मणिपूरसारखे राज्य केंद्र शासनाच्या भक्कम पाठिंब्याने व जनतेच्या राष्ट्रप्रेमाने भक्कम व स्थिर झाल्याचे वाटते.