विधान परिषद उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे

238

सामना ऑनलाईन, मुंबई

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर शिवसेना प्रतोद, आमदार डॉ. नीलम गोऱ्हेयांची आज बिनविरोध निवड झाली. तब्बल 60 वर्षांनंतर उपसभापतीपदी दुसऱयांदा महिला सदस्याची निवड झाली आहे. या आधी 1955 ते 1962 यादरम्यान जे. टी. सिपाही मलानी या विधान परिषदेच्या उपसभापती होत्या. काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीनंतर सभागृहात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. माणिकराव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर 20 जुलै 2018 पासून उपसभापतीपद रिक्त होते.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी डॉ.  नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा अर्ज सूचक म्हणून भरला होता. त्याला दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी अनुमोदन दिले तर शिवसेना सदस्य ऍड. अनिल परब यांनी सभागृहात उपसभापतीपदासाठी गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला भाजपच्या विजयभाई गिरकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी काँग्रेस आघाडीकडून मांडण्यात आलेला प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी मागे घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. दरम्यान, काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे आणि काँग्रेस सदस्य जनार्दन चांदूरकर यांनी आदल्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर न करता आज निवडणूक घ्यायला हरकत घेतली, मात्र सभापती रामराजे नाईक-निंबाळाकर यांनी यापूर्वी 24 जुलै 1998 आणि 13 सप्टेंबर 2004 असे दोनदा एका दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचा दाखला दिला आणि काँग्रेसची हरकत फेटाळून लावत स्वतःचे अधिकार वापरून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे घोषित केले.

आम्ही शिवसेनाप्रमुखांचे ऋण फेडले-विरोधक
एकेकाळी राष्ट्रपतीपदासाठी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा देण्याची वेळ आली तेव्हा सर्वात आधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला होता. बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानण्याची हीच चांगली संधी आहे असे मानूनच आणि त्यांचे ऋण फेडण्यासाठीच आम्ही आमच्या वतीने मांडलेला कवाडे यांच्या नावाचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी सांगितले.

आज बाळासाहेब ठाकरे यांची उणीव भासली -गोऱ्हे
आजच्या दिवशी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उणीव भासत असल्याची भावुक प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणातून दिली. मधुकर सरपोतदार, प्रमोद नवलकर यांची तणावपूर्ण वातावरणात एखादा छोटा विनोद करून भाषण करण्याची शैली होती. त्यांचीही आज या ठिकाणी आठवण होत असल्याचे त्या म्हणाल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही त्यांनी यावेळी आभार मानले.

आपल्या विविध कार्यांची माहिती त्यांनी पुस्तकरूपाने मांडली
नीलमताईंनी अनेक महिला चळवळींमध्ये सहभाग घेतला. आपल्या विविध कार्यांची माहिती त्यांनी पुस्तकरूपाने मांडली. प्रक्षप्रवक्त्या म्हणून त्यांनी आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या, अशा शब्दांत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गोऱ्हे यांची कारकीर्द सभागृहाचा गौरव वाढवेल
विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल गोऱ्हे यांचे अभिनंद करतानाच त्यांची कारकीर्द या सभागृहाचा गौरव वाढवण्याचे काम करील अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

विधान परिषदेच्या इतिहासात नवीन पान जोडले -मुख्यमंत्री
महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासात एक नवीन पान जोडले गेले आहे. तब्बल 60 वर्षांनंतर डॉ.गोऱ्हे यांच्या रूपाने विधान परिषदेच्या उपसभापतीपदी एक सक्षम आणि कार्यक्षम अशा महिला सदस्याची निवड झाली आहे. त्याबद्दल मी सभागृहाचे अभिनंद करतो आणि आभार मानतो अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते
काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभेच्या गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची गटनेतेपदी नियुक्ती केल्यानंतरही वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद मिळतेय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर पहिला आठवडा विरोधी पक्षनेत्याशिवायच कामकाज झाल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचा मार्ग निर्धेक केल्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. वडेट्टीवार यांना शेवटच्या अधिवेशनात अवघ्या सहा दिवसांसाठी विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. मात्र निवडणुकीनंतरही पुढील पाच वर्षे याच पदावर राहाल, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या