विवाह-कुटुंब संस्थेतही स्त्रियांचा आदर करण्याची गरज : डॉ नीलम गोऱ्हे

499
neelam-gorhe-speech

एखाद्या कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यास त्या मातेला त्रास देण्याचे प्रकार घडतात किंवा मुलगी होऊ नये यासाठी लिंगनिदान करून मुलींच्या गर्भपातासारखी पावले उचलली जात आहे. अशा घटना होता कामा नये. भविष्याचा विचार करिता विवाह व कुटुंब संस्था यात स्त्रियांना समान लेखण्याची व मातांचा आदर केला जाण्याची गरज आहे. प्रत्येकाने मुलींना वाढविले पाहिजे आणि मातृत्वाचा आदर केला पाहिजे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

कै. सौ. मनकर्णिका माता जन्म शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी हे होते. या कार्यक्रमास विद्यासागर प. पू. अॅड विष्णु महाराज पारनेरकर, जयश्री औटी, डॉ. मधुमिता पाटील, वनिता वझे, लक्ष्मीकांत पारनेरकर तसेच नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मुस्लिम समाजातील महिलांना सन्मानाची वागणूक आणि प्रतिष्ठा मिळावी. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजातील महिलांसाठी तिहेरी तलाक सारखा कायदा संसदेत मंजूर केला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील महिलांना होणार्‍या त्रासाला या कायद्यामुळे न्याय मिळण्यास मदत होणार आहे. हे लक्षात घेता तिहेरी तलाक बंदीकायद्याचे समर्थन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, आपला हिंदू धर्म जातीपाती, स्पृश्य-अस्पृश्यताच्या पलीकडे घेऊन जाण्याची गरज आहे, अशी शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. त्या शिकवणीतून प्रत्येक शिवसैनिक काम करताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, विद्यासागर प. पू. अॅड विष्णु महाराज पारनेरकर यांचे पूर्णवादाचे तत्त्वज्ञान समाजाला मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे. तसेच सौ. मनकर्णिका माता जन्म शताब्दी कार्यक्रमा निमित्त सर्वजण एकत्रित आला आहात. यातून सर्व समाजाला त्यांच्या एकत्रित आणण्याचा काम झाले असल्याचे दिसत असून मनकर्णिका माता यांनी अभ्यास करण्याबाबतचे पाच प्रकार सांगितले आहे. त्यामध्ये समाज धर्म, तप धर्म, ज्ञान धर्म, विश्व धर्म, राष्ट्र धर्म हे व्यक्तीच्या जन्म जात धर्मा पेक्षा किंवा स्त्री आणि पुरुष निसर्गधर्मापेक्षा मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकर्ती ते उपसभापती पदापर्यंतचा प्रवास खडतर, पक्षाने खूप काही दिले : नीलम गोऱ्हे

शिवसेना पक्षात जेव्हापासून काम करण्यास सुरुवात केली. त्या दिवसापासून राज्यातील अनेक भागात कार्यकर्ती म्हणून काम करण्याचा प्रसंग आला. महिलांवरील अन्याय अत्याचार, दुष्काळी भागाचा दौरा केला. यामध्ये अनेक नागरिक समस्या घेऊन भेटत असत. त्या सर्वांना न्याय देण्याचे काम केले. या सर्व कामाची पक्षाने दखल घेऊन प्रवक्ते, आमदार आणि आता विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवड केली आहे. हा सर्व प्रवास मागे वळून पाहताना समाधान तर वाटत असून हा प्रवास खडतर असल्याची भावना नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. तसेच पक्षाने मला खूप काही दिल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या