मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात चौकशी आणि पुराव्याची कागदपत्रे उपलब्ध करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान, एका व्यक्तीने ढिम्म नोकरशाही आणि सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला. तक्रारदाराने अर्ज आणि पुराव्याच्या कागदपत्रांची लांबलचक माळ बनवली, ती स्वत:भोवती गुंडाळून अजगरासारखं सरपटत जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. तिथे त्याने भ्रष्टाचार प्रकरणी नवीन जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.
गावातील मुकेश प्रजापती हे निमच जिल्ह्यातील पंचायत कांकरिया तलावामध्ये बांधकाम आणि विकासकामांच्या नावाखाली तत्कालीन सरपंच आणि त्यांच्या पतीवर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सातत्याने करत आहेत. मुकेश यांनी याआधी लोकायुक्तांकडे तक्रार केली आणि मुख्यमंत्र्यांनाही कळवले. पण निमच प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
पूर्व सरपंच पुष्पाबाई आणि त्यांच्या पतीने कांकरिया तलावालगतच्या जमीनी बळकाऊन सव्वा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय. त्याचे पुरावे देखील सादर करण्यात आले होते, मात्र आता त्याच्या तपासातही भ्रष्टाचार होत असल्याचे मुकेश यांचे म्हणणे आहे. मुकेश यांनी तत्कालीन जिल्हा पंचायत सीईओ गुरुप्रसाद यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि ईडीकडे चौकशीची मागणी केली. मुकेश प्रजापती अर्ज घेऊन अजगरासारखे रेंगाळत जिल्हाधिकारी कार्यालयात आले तेव्हा त्यांचे कपडेही फाटले. मुकेशला अश्या अवस्थेत पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील एका व्यक्तीने ढिम्म नोकरशाही आणि सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला. तक्रारदाराने अर्ज आणि पुराव्याच्या कागदपत्रांची लांबलचक माळ बनवली, ती स्वत:भोवती गुंडाळून अजगरासारखं सरपटत जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. pic.twitter.com/yVvulkoATL
— Saamana (@SaamanaOnline) September 3, 2024
जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा चौकशीचे आदेश दिले
मुकेशला अशा अवस्थेत पाहताच एसडीएम ममता खेडे आणि इतर अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुकेशला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक वेळा निवेदन करूनही ऐकले जात नसल्याचे मुकेशने सांगितले. आपल्याला न्याय हवा आहे. मुकेश यांनी संपूर्ण प्रकरण जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी हिमांशू चंद्रा यांना सांगितले. सध्या या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.