‘गे’ व्यक्तीशी लग्न कर! लग्नाशिवाय गर्भवती झालेल्या अभिनेत्रीला दिला होता सल्ला

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतेच आत्मचरित्र प्रकाशित केले आहे. त्यानंतर ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आत्मचरित्रात तिने आपले खासगी आयुष्य आणि लग्नाबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. गरोदर असताना तिच्या एका मित्राने तिला ‘गे’ व्यक्तीशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी तिने असे उत्तर दिले की मित्राची बोलतीच बंद झाली होती.

या बोल्ड आणि सुंदर अभिनेत्रीचे नाव आहे नीना गुप्ता. ‘सच कहू तो…’ असे तिच्या आत्मचरित्राचे नाव आहे. नीना गुप्ता यांनी आत्मचरित्रातून आयुष्यातील कडू-गोड आठवणींना वाट मोकळी करुन दिली आहे. त्यांना करिअर घडवण्यापासून खासगी आयुष्यातही बराच संघर्ष करावा लागला. नीना गुप्ता आणि वेस्टइंडीज प्लेयर सर विव्हियन रिचर्ड्स यांचे प्रेमसंबंध जगजाहीर आहेत. रिचर्डसपासून त्यांना मसाबा नावाची मुलगी झाली. मात्र मुलगी झाल्यावर विव्हियन रिचर्ड्सने लग्न करण्यास नकार दिला होता. तो काळ नीनासाठी फार खडतर होता. आधी विव्हियन रिचर्ड्ससोबत नात्यात असल्यामुळे त्या चर्चेत होत्या त्यानंतर ब्रेकअप झाल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. ब्रेकअपनंतर खचलेल्या नीनाने बाळाचा एकटीने सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आणि सिंगल मदर म्हणून त्यांनी मसाबाचे पालन पोषण केले.

नीना यांनी आत्मचरित्र ‘सच कहू तो…’ मध्ये लिहीलंय की जेव्हा त्या गरोदर होत्या तेव्हा लोकं त्यांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला देत होते. त्याकाळात एका मित्राने त्यांना सल्ला दिला होता की त्याचा एक मित्र ‘गे’ आहे, तो वांद्र्यात एका बॅंकेत कामाला आहे. सोसायटीतील काही लोकांना त्याच्यावर संशय आला आहे, त्यामुळे त्याला ते त्रास देत आहेत. त्याच्यासोबत लग्न केलं तर नीनाही आयुष्यात स्थिरावेल आणि तो मित्रही लोकांच्या त्रासापासून वाचेल. लोकांसाठी हे लग्न असेल पण तुम्ही तुमचे वैयक्तिक आय़ुष्य जगाल असा सल्ला या मित्राने दिला होता. त्यावर नीनाने जोरदार हसून त्यावर उत्तर दिले होते की माझ्यावर टिका होतेय म्हणून ती टाळण्यासाठी लग्न करायचेय असे नाहीये.

नीना यांनी म्हटलंय की त्या गरोदर असताना चित्रपट निर्माते -दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली होती. तिच्या बाळासह तिचा स्वीकार करण्याची तयारीही त्यांनी दाखवली होती. शिवाय लग्नानंतर हे मूल आपल्या दोघांचे असल्याचे सांगूया असेही त्यांनी सांगितले होते. या नात्यावर कोणालाही येणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र नीनाने त्यावेळी नकार दिला होता.

नीना यांनी दिल्लीतील चार्टर्ड अकाऊंटंट विवेक मेहरा यांच्यासोबत 2008 साली लग्न केले होते. 2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘बधाई हो’ चित्रपटात त्यांनी पन्नाशी पार केलेल्या, दोन मोठ्या मुलांची आई असलेल्या आणि तरीही गर्भवती राहिलेल्या महिलेची भूमिका साकारली होती.

आपली प्रतिक्रिया द्या