’मीडियम स्पाइसी’मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र

452

मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नीना कुळकर्णी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्वप्नील जोशी सोबत ‘मोगरा फुलला’ या चित्रपटात दिसल्या, तसेच अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते रवींद्र मंकणी हे विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या, मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’, या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. ही घोषणा करण्याचा योग नीनाजींच्या वाढदिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी जुळून आला, हे विशेष.

आजवर काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले हे जेष्ठ कलाकार नव्या पिढीच्या नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. चित्रपटात सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि ललित प्रभाकर हे प्रमुख भूमिकेत असून सागर देशमुख, नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांची समर्थ साथ लाभल्याने मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकीय पदार्पण लक्षवेधी ठरले आहे.

मोहित टाकळकर हे रंगभूमीवर प्रतिष्टित आणि नावाजलेले नाव आहे. लॅन्डमार्क फिल्म्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या विधि कासलीवाल यांना ‘वजनदार’, ’रिंगण’ आणि ‘पिप्सी’ यासारख्या लोकप्रिय आणि आशयसंपन्न चित्रपटांसाठी ओळखले जाते. ‘मीडियम स्पाईसी’ चे बहुतांश चित्रीकरण झाले असून, चित्रपट पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या