हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने Paris Olympics 2024 मध्ये रौप्य पदक पटकावत सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची किमया साधली. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर विक्रमी भाला फेकत सुवर्ण पदक पटकावले. मात्र आता नीरज चोप्रा पुन्हा एकदा नवीन स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे.
नीरज चोप्रा आता 22 ऑगस्ट रोजी लॉसने येथे होणाऱ्या Diamond League मध्ये खेळताना दिसणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळत असताना नीरजने डायमंड लीगमध्ये खेळण्याची इच्छा दर्शवली होती. बेल्जियमच्या ब्रुसेल्स इथे होणाऱ्या या स्पर्धेच्या फायनलसाठी पात्र होण्यासाठी नीरजला डायमंड लीगच्या एका लेगमध्ये खेळणे गरजेचे आहे. त्यामुळे तो 22 ऑगस्ट रोजी लॉसनेमध्ये खेळताना दिसेल. नीरज चोप्रा 2022 मध्ये झुरिचमध्ये झालेल्या डायमंड लीगचा चॅम्पियन ठरला होता. तसेच डायमंड लीग चॅम्पियन बनणारा तो पहिला हिंदुस्थानी आहे.
डायमंड लीग फायनल 13 आणि 14 सप्टेंबरला ब्रुसेल्समध्ये होणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथ्येक भालाफेकपटूला डायमंड लीगच्या एका लेगमध्ये प्रथम क्रमांकासाठी 8, दुसऱ्या क्रमांकासाठी 7, तिसऱ्या क्रमांकासाठी 6 आणि चौथ्या क्रमांकासाठी 5 गुण दिले जातात.