अलिबागमधील नीरव मोदीचा बंगला सील

सामना प्रतिनिधी । अलिबाग

नीरव मोदीच्या अलिबागमधील आलिशान बंगल्यावर आज सीबीआयच्या पथकाने दुपारी धाड टाकली. दहा ते बारा अधिकाऱयांच्या पथकाने दुपारी साडेबारा वाजताच बंगल्याचा ताबा घेतला आणि रात्री बंगला सील करण्यात आला. घरातील सर्व नोकरवर्गाला बाहेर काढत झाडाझडती सुरू केली. तसेच ग्रामपंचायतीमध्ये जाऊन नीरवच्या बंगल्या संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. दुपारी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

११ हजार ३०० कोटींचा पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघडकीस येताच डायमंडकिंग नीरव मोदीचा अलिबागेतील किहीम समुद्रकिनारी असलेला रुपनिया फार्म हाऊस हा आलिशान बंगलाही मीडियाच्या चर्चेत आला. मुंबई, ठाण्यात नीरवच्या आणि त्याच्याशी संबंधीत असलेल्या कंपन्यांवर धाडी सुरू असतानाच सीबीआयचे पथक किहीम गावात दाखल झाले. या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत नीरव मोदीचा बंगला आणि मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू होती. किहीममध्ये नीरव मोदी याची ७० गुंठे जागा असून यात पावणेचार गुंठय़ांत आलिशान बंगला बांधला आहे. नीरव मोदी याची किहीममधील मालमत्ता पावणेचार कोटींच्या घरात असल्याचे बोलले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या