निर्मात्यांविरोधात नीरजाचे कुटुंब जाणार न्यायालयात

14

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

प्राणांची आहुती देऊन विमान अपहरणकर्त्यांच्या तावडीतून प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या नीरजा भनोत हिच्या आयुष्यावर आधारित ‘नीरजा’ चित्रपटाने निर्मात्याला बक्कळ कमाई करून दिली. पण पैसा मिळताच निर्मात्याचे मन बदलले आणि त्याने नीरजाच्या कुटुंबाला या कमाईतील ठरलेला ठराविक हिस्सा देण्यास चक्क नकार दिला. यामुळे या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी नीरजाचे कुटुंब न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे.

हवाई सुंदरी असलेल्या नीरजाने  ५ सप्टेंबर  १९८६ साली स्वत:चे प्राण देऊन प्रवाशांची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका केली होती. नीरजाने दाखवलेल्या या हिमतीचे व धाडसाचे जगभरात कौतुक झाले होते. देशाची धाडसी मुलगी म्हणून नीरजाचे नाव ओळखले जाऊ लागले. तीला मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले होते.

याच पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी नीरजाच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचे ठरवले. त्यासाठी नीरजाच्या कुटुंबीयांची परवानगीही मिळवली तसेच या चित्रपटातून मिळणाऱ्या एकूण कमाईतील १० टक्के हिस्सा भनोत कुटुंबीयांना देण्यासंबंधी दोघांमध्ये करारही झाला.

त्यानंतर नीरजाची निर्मिती करण्यात आली. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने यात नीरजाची भूमिका केली. जगभरात अल्पावधितच हा चित्रपट हिट झाला. नीरजाने तब्बल १२५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर निर्माता व भनोत यांच्यात झालेल्या करारानुसार १२५ कोटींपैकी १० टक्के रक्कम मिळणे भनोत कुटुंबाला अपेक्षित होते. पण निर्मात्याने ते अद्यापपर्यंत दिलेले नाहीत. यामुळे निर्मात्याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी भनोत कुटुंबाने केली आहे. नीरजा नेहमी अन्यायाविरोधात लढण्यास प्रोत्साहन द्यायची तिच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही ही लढाई लढणार असल्याचे नीरजाचा भाऊ अनीश भनोत याने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या