रुग्णसेवा हाच आनंद

>>नीता गुरव, विक्रोळी

महापालिकेच्या रुग्णालयामध्ये परिसेविका म्हणून मी काम करीत आहे. माझं जग नेहमीच धावपळीचं असलं तरी माझ्या कुटुंबाला मी प्रथम प्राधान्य देते. माझ्या दोन्ही मुलींना घडविताना त्यांच्यावर चांगले संस्कार होतील, असा विचार सतत असतो. त्यांच्या सर्व आवडी-निवडी मनापासून जपते. त्यांना प्रत्येक बऱ्या-वाईट गोष्टींची जाणीव आणि ओळख करून देते. परिसेविका असल्यामुळे घराव्यतिरिक्त माझा सर्व वेळ रुग्णालयातील कामासाठी खर्च होतो. प्रत्येक रुग्णाला आईच्या-बहिणीच्या मायेने कसे बरे करता येईल यावर माझे सर्व लक्ष असते. मी स्पष्टवक्ती असून माझ्या रुग्णसेवेशी प्रामाणिक आहे. त्यामुळे मी कोणाला घाबरून काम करीत नाही.

मला २००९ साली कर्करोग झाला होता. वेळेवर योग्य उपचार केल्याने मी पूर्णपणे बरी होऊन पुन्हा रुग्णसेवेला जाऊ शकले. आता यापुढील जगणे कर्करुग्णांना मदत करण्यासाठी घालवणार असं ठरवलंय. अर्थात माझे पती आणि माझ्या दोन्ही मुली मदत करतातच. जेथे कर्करोग रुग्ण असतील तेथे जाऊन त्यांना आरोग्यविषयक माहिती देते. त्यांनी सकारात्मक जीवन जगावे म्हणून माझे स्वतःचे उदाहरण देते. माझ्या वेतनातील काही भाग गरीब रुग्णांसाठी दान करते. आदिवासी पाडय़ांमध्ये जाऊन स्त्रीयांनी स्वतःची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती देते. नेहमीच्या जगण्यापेक्षा हे वेगळे जगणे आवडते.

प्रत्येकीचं स्वतःचं असं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या साऱ्यांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमच्या स्वतःतील वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. वेगळ्या वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता : श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ किंवा backspage१८@gmai>.com या ईमेलवरही पाठवता येईल.