नेहरू सेंटरच्या भिंती शिवरायांना ‘महाराज’ बोलेनात! मराठा योद्ध्याचा  महाराष्ट्रातच एकेरी उल्लेख

949

मंगेश मोरे । मुंबई

वरळी येथील नेहरू सेंटरच्या भिंतींवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा चक्क एकेरी उल्लेख आहे. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या नावाने इतिहासप्रेमींना आकर्षित करणार्‍या सेंटरलाच जर दस्तुरखुद्द शिवरायांबद्दल आदर नसेल तर ते महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची खरी ओळख काय घडवणार, असा सवाल शिवप्रेमी करीत आहेत.

खगोलशास्त्र जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणावर खगोलप्रेमी, पर्यटक नेहरू सेंटरला भेट देतात. त्यांना हिंदुस्थानच्या इतिहासाचीही ओळख व्हावी या हेतूने सेंटरच्या पहिल्या माळ्यावर विविध कला तसेच युगपुरुषांच्या माहितीचे सचित्र प्रदर्शन करण्यात आले आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर कामगिरीचाही इतिहास वाचायला मिळतो. मात्र कलादालनाच्या भिंतींवर शिवरायांबद्दल आदर तसेच त्यांच्या नावासोबत ‘महाराज’ ही उपाधी जोडण्याचे सौजन्य सेंटर प्रशासनाने दाखवलेले नाही.

नेहरू सेंटरवर केंद्र सरकार अखत्यारीत ट्रस्टचे नियंत्रण आहे. इतिहासाची ओळख घडवण्यासाठी ‘माय मराठी’ला बाजूला सारून हिंदी आणि इंग्रजी भाषा वापरण्यात आली आहे. शिवरायांबद्दलचा अनादर तसेच माय मराठीला दूर लोटण्याचा प्रकार यातून जणू नेहरू सेंटरच्या पोटातील महाराष्ट्रद्वेषाचेच दर्शन घडू लागले आहे. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन केंद्रात सत्ता मिळवलेल्या भाजप सरकारचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने इतिहासप्रेमी आश्चर्यासह संतापाची भावना व्यक्त करीत आहेत.

नेहरू सेंटरमध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख करण्यात आला असेल तर ती सेंटर प्रशासनाची मोठी चूक आहे असेच मी म्हणेन. प्रशासनाने ही चूक वेळीच दुरुस्त केली पाहिजे. –  विश्वास पाटील, पानिपतकार

महाराष्ट्राच्या राजाचा अनादर खपवून घेतला जाणार नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही सेंटर प्रशासनाचा निषेध करतो. प्रशासनाने वेळीच चूक सुधारावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. त्यावेळी होणार्‍या नुकसानीला प्रशासन व सरकार जबाबदार असेल. – नानासाहेब कुटे-पाटील, अध्यक्ष, बुलंद छावा मराठा युवा परिषद

कलादालनात हिंदी-इंग्रजीबरोबरच मराठी भाषेत इतिहासाची ओळख घडवण्याच्या कामाला लवकरच सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सेंटरच्या कलादालनात केला गेलेला एकेरी उल्लेख ही आमची चूक असून ती प्राधान्याने दुरुस्त केली जाईल. –  चंद्रकांत राणे, सहसंचालक, नेहरू सेंटर

आपली प्रतिक्रिया द्या