नेहा पेंडसे नव्या भूमिकेत

अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाहत्यांसाठी एक सरप्राईज घेऊन येणार होती. आपल्या नवीन चित्रपटाची ती घोषणा करणार होती, मात्र ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे या घोषणेची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे.

रोहित मित्तल दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शार्दूल सिंग बायस, नेहा पेंडसे बायस आणि निखिल महाजन यांनी केली असून चित्रपटाचे लेखन श्रीपाद देशपांडे आणि रोहित मित्तल यांचे आहे. सध्या जरी या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात असले तरी लवकरच ते प्रेक्षकांसमोर येणार आहे. याविषयी नेहा म्हणाली, माझ्या वाढदिवशी मी माझ्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार होते, मात्र सध्या चित्रपटाच्या घोषणेची ही योग्य वेळ नाही असे मला वाटते. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे नुकतेच निधन झाले. सिनेसृष्टीने एक उत्कृष्ट कलाकार गमावला आहे.

त्यामुळे या घोषणेसाठी आम्ही थोडी प्रतीक्षा करणार आहोत. ‘गोदावरी’ आणि आज ज्या चित्रपटाची घोषणा होणार होती, त्या चित्रपटातही विक्रम गोखले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आज ते आपल्यात नाही, परंतु त्यांच्या आठवणी आमच्यासोबत कायम असतील. हा नवीन चित्रपट आम्ही त्यांना समर्पित करणार आहोत, असे निखिल महाजन यांनी सांगितले.